फॉलोअर

घरटे...

                  घरटे...




वेदा गॅलरीत एकटीच झोका खेळत होती. दुपार नुकतीच टळून गेली होती. वैदेही तिथेच एकीकडे बसून पुस्तक वाचत होती. रविवार असल्याने सुट्टी होती, म्हणून ती घरीच होती. वडिलांच्या ओळखीच्या एका पतसंस्थेत ती काम करत होती.
 वेदा खेळत असताना तिच्या अंगावर काही बारीक बारीक काड्या आणि कापूस पडत होता. तिला झोका खेळताना याचा त्रास होत होता.. 
 कारण वरती चिमणीचे घरटे होते. आणि या घरट्यात पिल्ले ही होती.. ती तिथे सारखी चिव चिव करत होती.. आणि हलकेच इकडून तिकडे घरट्यातच फिरतही होती.. मधूनच चिमणा किंवा चिमणी आली की मोठ्याने चिवचीवाट ही करत होती..
 या सर्वांचा, तिला खेळण्याला अडथळा होऊ लागला.. म्हणून तिने घरातून काठी आणली. आणि खटखट असं इकडे तिकडे वरच्या काड्यांना मारू लागली. वैदेहीचे तिच्याकडे लक्ष होते. दोन-तीन वेळा तिला ओरडलीही होती.आणि पुन्हा तिच्या समोरील पुस्तकात हरवली होती.
 हिचे आपले चालूच होते.. मध्ये झोका खेळायचा.. मध्येच काठीने खटखट करायचे..

या सर्व कलकलाटाने मात्र बेबीताईंची झोप मोडली.. आणि त्या बडबडतच गॅलरीत आल्या.. आणि वेदाला ओरडू लागल्या..
"अगं का असं त्या चिमणीच्या घरट्याच्या मागे लागलीस! राहू दे की पिलं आहेत चिऊ ताईची त्यामध्ये.."

"मला सारखा त्रास होतो आहे ना? झोका खेळायला." वेदा म्हणाली.
"असं करू नये गं वेडाबाई." बेबीताई.
"आणि,माझ्या पायाला या काड्या ही टोचत आहेत. चिवचिव पण सारखी सुरूच असते त्यांची.. मला पोएम म्हणता नाही येत मग.."
जरा घुश्यातच वेदा म्हणाली.
"अगं, पिल्लांसाठीच घर केले आहे चिमणीने.. काडी काडी जमवून.. आणि मऊ मऊ कापूस अन् चिंध्या पण आहेत बघ.."बेबीताई वेदाला समजावून सांगु लागल्या.
"तु काठी मारुन अशी त्यांना त्रास देऊ नकोस.. पंख फुटले की जातील उडून तोपर्यंत या घरट्याच्या उबेत राहतील छान.."

वैदेही ही हे सर्व ऐकत होती.."बघ ना आई,मी पण कीतीवेळा तीला सांगितले.. पण, ऐकत नाही ग.."वैदेही म्हणाली.
हे बघ बाळा, पिल्लांची मम्मी पप्पा त्यांना खाऊ आणून देण्यासाठी सारखी बाहेर आणि घरट्यात ये जा करत असतात. ते आले की मग पिलं,' मला दे मला दे' असे म्हणत चिवचिव करतात. तू नाही का बाबांनी काही आणले की, 'मला द्या ना' म्हणून त्यांच्या मागे मागे फीरतीस.अगदी तसेच बघ.."
बेबी ताई म्हणाली.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात 
वेदा मात्र हे मन लावून ऐकत होती. यावर ती‍म्हणाली "माझे पप्पा कुठे असं रोज रोज मला खाऊ आणतात…?"

या तिच्या प्रश्नावर बेबी ताई मात्र निरूत्तर झाल्या.

या वेदांच्या प्रश्नाने वैदेही मात्र आतपर्यंत चरकली.. तिच्या काळजात एक वेगळीच हुरहूर जन्माला आली..

पण! या तिच्या अवस्थेला तीच तर जबाबदार होती..

वैदेही ही, साधारणपणे तीन साडे तीन वर्षापासून माहेरीच राहत होती. वेदा दोन अडीच वर्षाची असल्यापासून.. बेबीताईंनी म्हणजेच तिच्या आईने तिला बऱ्याच वेळा समजावून सांगितले.. पण काही उपयोग झाला नाही.. तिने सासरी जाण्यास चक्क नकारच दिला होता.                  
"संसारात सुखदुःख असतातच.. ती सगळी पचवून सासरी संसार करायचा असतो.. आणि गोडी टिकवून ठेवायची असते..मुलं झाल्या वर तर त्यांच्या साठी संसार सांभाळायचा असतो.." पण तिला समजतच नव्हते बाबांनी पण खूप वेळा तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण वैदेहीच्या काही लक्षातच येत नव्हते.

वैदेही, आई झाल्यापासून कृष्णाच्या, म्हणजे तिच्या नवऱ्याच्या वागण्यात थोडा कडवटपणा आलेला तिला जाणवत होता.. आणि अश्यात तर त्याचे ऑफिसचे काम वाढल्याने त्याचे नेहमीच उशिरा येणे होत होते.. मग जेवणही बाहेरच होऊ लागले.. आणि मग हळूहळू पीणेही सुरू झाले.. पण मग त्या सगळ्या गोष्टीचा त्रास हिला व्हायला लागला.. त्याचे आई वडील समजून घेत होते. पण हीचा ताण वाढत गेला..एक मानसिक दडपण तिला यायला लागले होते…
आता हे नेहमीचेच झाले होते..

 एक दिवस रविवारची सुट्टी होती.. म्हणून तिला वाटले की बाहेर कुठेतरी जावे.. त्याला मात्र ऑफिसच्या कामानिमित्त आऊट ऑफ ट्रीप होती.. म्हणून ही भडकली.. आणि "सुट्टीच्या दिवशी तरी माझ्यासाठी..? असं म्हणताच, कृष्णाने तिला दोन चापटा मारल्या ..आणि "मी काही हौसेने जात नाहीये.. माझी ड्युटीच मी करतो आहे.. नोकरी बघूनच तू लग्न केले ना माझ्याशी..?"
 तो रागात बोलून गेला पण त्याने असं बोलायला नको होतं.. हे आई-बाबा त्याला म्हणाले.. पण वेळ निघून गेली होती.. तो निघून गेला. 
 हे आता तिला नवीन नव्हते पण यावेळी मात्र तिला खूप राग आला.. आणि म्हणून… ती वेदाला घेऊन तडक माहेरी निघून आली. 
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात 
तिला वाटले की" कृष्णा येईल मला न्यायला." पण त्याने तसे केले नाही.. त्याने फोन करून सरळ सांगितले," जशी गेली.. तशी परत येऽ मी तुला न्यायला येणार नाही.." वैदेही पण जिद्दीच होती ती म्हणाली," तू आल्याशिवाय मी येणार नाही.."

 आणि आजपर्यंत कृष्णा तिला न्यायला आलेला नाही..तसा येऊन वेदाला भेटून जात होता.. येताना तिला खेळणी खाऊ घेऊन यायचा.. त्याच्या आई वडिलांनी त्याला खूप समज दिली पण तो दिवस.. अजूनही आलेला नव्हता की दोघांमध्ये वादाची जागा संवादाने घेण्याचा…

वैदेही माहेरी निघून आली.. चार महिने..सहा महिने.. वर्ष.. झाले होते पण..
असे किती दिवस बसुन खायचे?
म्हणून तिने वडिलांच्या ओळखीच्या एका पतसंस्थेत काम करायला सुरुवात केली.त्यामध्ये तिचा वेळ जात होता आणि पैसे ही मिळत होते.
मध्ये मध्ये वेदाचे आजी आजोबा ही नातीला आणि सुनेला भेटून जात होते.

ते दोघे ही हिला चल म्हणत होते पण ..

दोघांमध्ये सिमेंट होत नव्हता..

असे पाहून दोघांनीही वेगळे व्हायचे ठरवले होते..

तशी पावले उचलून, कोर्टात सर्व कागदपत्रे सादर केले होते..
काही दिवसांतच ही प्रक्रिया पूर्ण होणार होती..

मात्र त्यादिवशी कोर्टात जे घडले ते अनपेक्षित होते..केस चालु होती ..पण इंटरव्हल झाली.. त्यानंतर काम सुरू होणार ..
ही कथा आपण kusumanjali.com var वाचत आहात.
इतक्यात वेदाने तिच्या आईला ओढत ओढत आरोपीच्या पिंजऱ्या पर्यत नेले.. आणि मग पप्पानाही ती तिथे घेऊन आली.. दोघांनाही तिने एका पिंजऱ्यात उभे केले..

ती काय करते आहे कोणालाच काही कळेना..
दोघांनाही तिने, एकाच पिंजऱ्यात उभे केले…आणि स्वतः दोघांच्या मध्ये उभे राहुन
हात जोडुन जज़ साहेबांकडे बघुन म्हणाली,"जज़साहेब जज़साहेब,मला माझ्या घरात मम्मी पप्पा दोघेही हवे आहेत.दिवसा पप्पा सोबत खेळायचे, आणि रात्री मम्मीच्या उबदार कुशीत निवांत झोपायचे.. तुम्ही असंच घर द्या.. अगदी चीऊच्या घरट्या सारखे…" असे म्हणताना तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते.

असं हे पाहुन दोघांच्या, म्हणजेच वैदेही आणि कृष्णाच्या मनातले वादाचे जाळे नष्ट 
झाले.आणि स्वच्छ प्रकाश पडला..
"आपल्या पेक्षा आपल्या पीलां साठीच घरटे जपायचे असते."
हे दोघांनाही पटले. सगळेच आश्चर्य चकित होऊन तिच्या कडे पाहात होते..
वैदेही मनात विचार करू लागली"जे मला जमले नाही, ते या सहा वर्षांच्या मुलीने.. .."आज मात्र तिला या पोरीचा अभिमान वाटला होता..
कृष्णानेही तिला उचलुन कडेवर घेतले
छानसी तिची पप्पी घेतली, आणि वैदेही समोर आपला हात केला..
तिनेही आनंदाने आपला हात त्या हातावर ठेवला..


सौ.शुभांगी सुहास जुजगर.

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या