स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रींया
मी..
आज मागे जाणार आहे. कारण आपण सध्या सर्व भारतीय 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' साजरा करत आहोत. हे स्वातंत्र्य मिळवण्यात क्रांतिकारकांचा सिंहाचा वाटा आहे.
या स्वातंत्र्या साठी अनेकांनी आपल्या घरांदारावर निखारे ठेवले होते. अन् आपले आयुष्य स्वातंत्र्य यज्ञात झोकुन दिले होते. देव, देश आणि धर्मासाठी, कशाचीही पर्वा न करता, दिवसरात्र कार्य करत राहिले आहे. आणि म्हणुनच आज आपण स्वतंत्र देशात सुखाने, समाधानाने राहात आहोत.
या स्वातंत्र्य चळवळीत स्त्रिया ही मागे नव्हत्या. त्याही अगदी पदर खोचुन या कार्याची धुरा सांभाळत होत्या. जे जे जमेल ते ते आवडीने करत असत. एखादा निरोप पोहोचवणे, किंवा खबर काढुन आणणे म्हणा. त्या चोख करत होत्या. क्रांतिकारकांना वेळच्या वेळी जेवण तयार करून देणे. ते जेवन त्यांच्यापर्यंत बेमालूम पणे पोहोचवणे. या कामात त्या तरबेज होत्या. तर काही जणी प्रत्यक्ष कृती करून आपला खारीचा वाटा उचलत होत्या.
काही क्रांतिकारक सहा सहा महिने घरी फिरकतही नसायचे.किंवा काही तुरुंगात शिक्षा भोगत असत .या बिकट परिस्थिती मध्ये सर्व कुटुंबाचा भार तिच्यावर येऊन पडत होता. सासु, सासरे, मुलं, याबरोबरच दुखणी. आणि बाहेरच्या परिस्थितीला पण सामोरं जात होत्या. तर काही पतिची प्रेरणा बनुन होत्या .
यमुनाबाई विनायक सावरकर आणि दगडाबाई शेळके या विरांगणांचा अल्प परिचय करून देण्याचा माझा हा छोटास प्रयत्न आहे.
यमुनाबाई या भाऊराव चिपळूणकर, ठाणे. याची कन्या होय.
भाऊराव हे जवाहर रियासत चे दिवाण होते. अतिशय सुखवस्तू हे कुटुंब होते. घरी सगळीच रेलचेल होती. या वैभवशाली घरात वाढलेली ही बालिका. हिचा विवाह विनायक दामोदर सावरकर यांच्याशी झाला.
विनायक यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत हवी होती. आणि ती मदत भाऊराव चिपळूणकर यांनी केली होती. त्यानंतर सावरकर हे लंडनमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले.
यमुनाबाई यांना माई या नावानेच ओळखले जात होते. माहेरी चांदीच्या ताटात जेवणारी ही यमु सासरी मात्र तारेवरची कसरत करत करत संसार फुलवत होती. प्रत्येक पाऊल हे परिक्षेचे असायचे. चार लेकरं पदरात होती. या सर्वांचे करताना माईचा जीव मेटाकुटीला येत होता. कारण सावरकर हे अंदमानात होते.
त्यांना देशसेवेच्या वेडाने जणू झपाटलेले होते. मोठा मुलगा चार वर्षाचा असताना, त्याला योग्य उपचार न मिळाल्यामुळे, देवाघरी गेला. कारण त्यावेळी सावरकर लंडन येथे होते.
प्रभात, शालिनी आणि विश्वास. यामध्ये, शालिनी ही पण अल्पायुषी ठरली. बालपणीच देवाघरी गेली.
माई. म्हणजे यमुनाबाई सावरकर.
याही एक देशभक्त.
पतीला काळ्यापाण्याची शिक्षा झाल्यानंतर, मुलाचा उपचाराविना मृत्यू झाला होता. पण त्या जराही डगमगल्या नाहीत. इंग्रजांची माणसे रोज रोज येऊन परेशान करत असत. या न त्या कारणाने त्रास देत असत.
त्यांनी अशा या परिस्थितीत स्वतःला सावरून इतर महिलांमध्ये देशाभिमान जागवण्यासाठी, अभियान सुरू केले. सोबतीला येसूवहिनी ही होत्या. म्हणजे सावरकरांच्या मोठ्या भावाची बायको.
म्हणजे सावरकरांचे मोठे बंधू , बाबाराव उर्फ गणेश सावरकर. यांनाही काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती.
माईंच्या धीराचा हा एक अनुभव..
सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानात जायचे होते. पण त्यापूर्वी ते मुंबई येथे डोंगरी जेलमध्ये होते. अंदमानात जाण्यापुर्वी माई त्यांना भेटायला गेल्या. कारण त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा म्हणजे 'परतून पुन्हा न येणे' असे तेव्हा होते. डोंगरी येथील जेलमध्ये सावरकर आणि माई यांची भेट झाल्यावर दोघेही खूप भाऊक झाले. हुंदके दाटून डोळे भरून आले. पण सावरकरांनी मात्र स्वतःला सावरले.
आणि ते माईला म्हणाले, "मी काडी काडी जमवून संसार करणार्यातला नाही. असा संसार चिमणी-पाखरे, कावळे ही करतात. मी मात्र माझ्या देशालाच परिवार समजतो. आणि या देशाचा संसार मी मांडला आहे. याचा तुला अभिमान वाटला पाहिजे. जोपर्यंत माझा देश स्वतंत्र होत नाही तोपर्यंत माझा लढा चालूच राहील. मला तोपर्यंत स्वस्थता लाभणार नाही. यमु हे बघ, एक ज्वारी चा दाना, जेव्हा जमिनीत रुजतो तेव्हाच एक कणीस तयार होते. अशाच प्रकारे या देशाची पुढची पिढी चांगली आणि स्वतंत्र जगवायची असेल तर, समृद्ध भारत घडवायचा असेल तर.. आपल्याला रुजावेच लागेल. "
यमुना हे सर्व स्तब्ध होऊन ऐकत होती. काय बोलावे... तिला काहीच कळेना.
"यमु,ही आपली शेवटची भेट असंच समज, पुढच्या जन्मात अवश्य भेटु."
हे ऐकल्यावर मात्र माईचा बांध फुटला. हुंदके अनावर झाले. पण लगेचच स्वतः च्या भावना आवरुन त्या सावरल्या. आणि पतिच्या पायांना स्पर्श करून म्हणाल्या, "तुम्ही बिल्कुल चिंता करू नका. आपण पुन्हा नक्कीच भेटु. तेही याच जन्मी. पुढचा जन्म कुणीपाहिला आहे? मला माझे मन सांगते आहे. आणि तुमच्या दृढ निश्चयावर देखील, माझा पुर्ण विश्वास आहे. ही शिक्षा पूर्ण करुन तुम्ही नक्कीच परत याल. ब्रिटिशांना भारतातुन हाकलायचे आहे ना ? ते काही नाही तुम्ही फक्त तब्येतीची काळजी घ्या." माईच्या या वाक्याने सावरकरांना केवढा धीर आला होता.
पण इकडे माईच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते. विव्हळ अंतकरणाने त्या घरी परतल्या, घरी येऊन देवा समोर बसल्या आणि म्हणाल्या, "हे देवा, आता सगळा भार तुमच्या खांद्यावर आहे, ह्यांना सुखरूप परत आणा."
त्या नंतर माईंनी स्वतः ला देशभक्ती आणि समाज जागृती साठीच्या कार्यात झोकुन दिले.
सावरकरांनी अंदमानात लिहलेले "कमला " हे महान काव्य याचे पूर्ण स्वरूप माईच्या ( तारूण्यतील ) व्यक्तित्वाशी मिळते जुळते आहे. यावरून, जगण्याची प्रेरणा किंवा शक्ती म्हणजेच माई त्यांच्या सोबत होत्या.
स्त्री ही एक शक्ती आहे. भक्ती आहे. मायेची सावली आहे. प्रेरणा बनुन गरूडभरारी घेणारी आहे.
माईना माझे शत शत नमन.
आज आणखी एका कर्तृत्ववान स्त्रीचा परिचय मी करुन देणार आहे. ज्यांनी आपले आयुष्य देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी खर्च केले. या म्हणजे झुंजार अशा दगडाबाई शेळके.
रझाकारांचा नंगानाच सुरू असतानाच हसनाबाद या गावात एकच दंगल उसळली. गावकरी आणि रझाकार यांच्यात चकमक सुरू झाली. अश्या या परिस्थितीत एका तरुणीने पोटावर रांगत जावुन रझाकारांची छावणी गाठली. तेथे गोळीबार केला. त्यात बरेच रझाकार ठार झाले.याचा परिणाम म्हणून परत सगळी कडे नाकेबंदी करण्यात आली. यावेळेस ही याच युवतीने पुढे येत दुश्मनों छावणी वर हात बाॅम टाकले. हीच शुरवीर,आणि तेजस्वी युवती म्हणजेच दगडाबाई या, हैद्राबाद मुक्ती लढ्यातील क्रांतिकारक आहेत. या मुक्ती संग्रामात त्यांनी रझाकारांच्या विरुद्ध लढा दिलेला आहे.
जालना जिल्ह्यात बदनापुर तालुक्यातील, छोट्या गावात, गरीब शेतकरी कुटुंबात यांचा जन्म झाला. वडील लहानपणीच वारले. घरात तीन-चार भावंडं. पण तरीही आईने मोठ्या धीराने मुलांना सांभाळले. यामुळे शाळेचा गंध देखील दगडाबाई ला नव्हता.
पण रानावनात फिरताना, झाडावर चढणे, उंचावरून उड्या मारणे, निर्भयपणे मनसोक्त हुंदडणे. असे सर्व मुलां सारखेच आयुष्य त्या जगत होत्या. घरकामाची विशेष आवड त्यांना नव्हती. त्या ऐवजी हाती तलवार धरुन चालवणे, पिस्तूल चालवणे, ही कामे त्यांना अतिशय आवडत होती.
त्यांच्या गावातील एक विद्वान ब्राह्मण, पोथी पुराण सांगत असे. पण जोडीला शिवाजी महाराजांच्या गोष्टी, झाशीच्या राणीची गोष्ट, वीरश्री ने भरलेली पोवाडे ते गात असत. हे सर्व ऐकुन लहान दगडाबाई प्रभावित होत होती. त्या बरोबरच हैद्राबादचे निझामी संस्थान प्रजेवर कसे अत्याचार करत आहे. जुलमी इंग्रजी राजवटी विरूद्ध संपूर्ण देशात उठाव कसा सुरु आहे. हे ही ते लोकांना पटवून देत होते. हे सर्व ऐकून दगडाबाई च्या मनावर कोरले गेले. 'आपणही हे जुलमी निझामी सरकार उध्वस्त करण्याचे काम करायचे' असे मनोमनी ठरवले.
पुढे योग्य वेळी लग्न झाले. जवळच असलेले धोपटेश्वर हे त्यांचे सासर. पण संसारात त्यांचे मन रमले नाही. कारण शांत, शालीन असा त्यांचा स्वभाव नव्हता. शिवाय घरकामात रसही नव्हंता.
याच वेळी निझामशाही विरोधात उठावाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. म्हणुन दगडाबाई स्वंयं प्रेरणेने यामध्ये सामील झाल्या. शस्त्र चालवण्याचीही त्यांची तयारी होती. यासाठी त्यांनी बंदुक आणि हातगोळे चालविण्यासाठीचे प्रशिक्षण घेतले होते.भिल्ला कडुन शस्त्रे चालवण्याचेही शिक्षण घेतले.असे हे प्रशिक्षण घेवुन ही वीरांगना रझाकार विरुद्ध उभी राहिली.
एकदा, निझाम सरकारच्या सैनिकांनी नांदेडच्या सभेहून परतताना.दगडाबाई कडे शस्त्र सापडले म्हणुन अटक केली.आणि तुरुंगात ही पाठवले. पॅन्ट शर्ट घालून बंदुकी सह घोड्यावर प्रवास करीत असल्यामुळे समाजाने त्यांच्यावर आक्षेप घेतला. त्यांना बोल लावले, आणि सासरच्या कुटुंबानेही त्यांना टाकून दिले.
पण या कडे दगडाबाई ने लक्ष दिले नाही आपले कार्य चालूच ठेवले. बाई असूनही जीव धोक्यात घालून रेल्वेरूळ उखडणे, रझाकारांच्या छावण्या बॉम्बने उडवणे, पोलीस चौक्या वर हल्ले चढवणे, सरकारी दप्तरे जाळणे, अशी कामे त्यांनी लीलया केली.
कसलेल्या योध्याप्रमाणे दगडाबाई एका हातात बंदुक आणि दुसर्या हातात घोड्याचा लगाम धरुन, अख्ख जंगल त्या पालथे घालीत स्वातंत्र्यसैनिकांना रात्रीची रसद पुरवत असत.रझाकार यांची मग्रूरीपाहुन, स्त्रियांवर होत असलेले अत्याचार पाहून,त्यांचे रक्त पेटून उठत होते.समोरच्याच्य् नरडीचा घोट घेण्यासाठीच त्याचे हात शिवशिवत असत.
"माहेरची लढाई" म्हणून खूप गाजलेली अशी, कोलते टाकळी, तालुका भोकरदन येथील निजामाच्या पॉवर कॅम्पवर हात गोळे टाकून अख्ख्या कॅप उद्ध्वस्त केला होता.
एकदा रजाकारांनी त्यांच्या गावासह आणखी गावांना वेढा घातला. मुले,म्हातारी माणसे स्त्रिया यांना मध्यभागी ठेवून,दगडाबाईने
३४ हजार माणसांची लढाऊ फळी तयार करून. त्यांनी लढाई केली. पण रजाकाराच्या हाती लागायचे नाही. यासाठी पाणी भरणाऱ्या स्त्रिया मध्ये मिसळून दगडाबाई फरार झाल्या.
या त्यांच्या कामामुळेच पुढे त्यांना मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हटल जात होत.
पुढे काही दिवसानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर निजामी राजवट संपवण्यात कार्यकर्त्यांना यश आले. तोपर्यंत दगडाबाई खांद्यावर बंदुक टाकून सर्वत्र फिरत होत्या. स्वयंसेवकाच्या परेडमध्ये भागही घेत असत आणि अत्याचाराविरुद्ध लगेच कारवाई करत असत. या वीरांगणेचा दगडाबाई चा मृत्यू ५ मे २०१३ रोजी झाला झाला धोपेश्वर येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
या महान क्रांतिकारी महिलेला माझे शत शत नमन.
सौ. शुभांगी सुहास जुजगर .
0 टिप्पण्या