फॉलोअर

माझं कुंकू...

माझं कुंकू...



    'नका माझं कुंकू पुसु नका. नका माझे कुंकू पुसू नका..'

असं बडबडणाऱ्या राधाबाईला प्रसादने दवाखान्यात अँडमिट केले होते. तीन-चार दिवसापासून त्यांचं हे असं  बडबडणं चालू होतं. दवाखान्यातील इतर मंडळी टकामका राधाबाई कडेच बघत होती. आणि 'देवा देवा' 'अरेच्चा' 'अरेरे' असे सहानुभूतीपूर्वक उच्चार  करत होती. 

 तीन-चार दिवसांपुर्वी राधाबाई ला ऍडमिट केले, कारण म्हणजेच आठ दिवसापूर्वी प्रसाद चे वडील म्हणजेच राधाबाई चे यजमान हे, देवा घरी गेले होते. त्यामुळे त्यांच्या मनावर दडपण येऊन, अशीच सतत काहीतरी बडबड चालू केली होती. तसेही ते या सर्वाना असूनही नसल्यासारखेच होते. पण..!


              


 राधाने अगदी काडी काडी जमवून संसार उभा केला होता. या संसार वेलीवर छानशी दोन फुले उमलली होती.  यशवंत म्हणजेच राधाचे पती. हे सरकारी कार्यालयात प्युन चे काम करत होते. खाऊन पिऊन सुखी, असे हे कुटुंब होतं. दोन्ही मुले शाळेत जात होती.  हुशारही होती. राधा ही थोडेफार शीलाईचे काम करत होती. संध्याचा मात्र आईभोवतीच पिंगा  सुरू असायचा. अशी ती आई आणि बाबांची लाडाची लेक होती.



एके दिवशी संध्याकाळी,

"आई मला भुलाबाई ला जायचं आहे,काही खाऊ देना, माझ्या सगळ्या मैत्रिणी अनुदीदीच्या घरी गेल्या आहेत. मीच मागे राहिले आहे." संध्या म्हणाली.

"काय देऊ?" दळण करत असलेल्या राधाने तिला विचारले.

"काहीतरी डब्यात घालून पटकन देना."

 तोंड टॉवेलला पुसत पुसत संध्या म्हणाली. तिची अगतिकता पाहून राधा लगेच उठली. आणि तिने चिवडा आणि चकली भरून डबा पटकन पलंगावर आणून ठेवला. तितक्यात तिथे प्रसाद टपकला..


 संध्या आत कपडे बदलत होती.. असे पाहून त्याने खाऊ चा डबा उचलून घेतला, आणि तिथे चक्क रिकामा डबा ठेवला, राधाच्या हे लक्षात आले. त्याच्यावर ती रागावली.

"पण तू थांब ग, आपण थोडी गंमत करू." 


असं, प्रसादच बोलणं ऐकून ती गप्प बसली. इतक्याच संध्या आतून आली आणि  तिने पटकन डबा उचलला. उचलता उचलता आईला म्हणाली," दिलाय ना खाऊ."

 आईच्या होकाराची ही तिने वाट पाहिली नाही. तरातरा निघूनही गेली.


 ती गेल्यावर प्रसाद आईला म्हणाला. "आई आता कसं?"

"मी तुला नको म्हणाले होते, ऐकले नाही. आता लेकरू सगळ्यां समोर अपमानित होईल." राधा रागानेच त्याला म्हणाली.

"अग मला वाटले की, डबा उघडून पाहिल, मग आपण तिला हा डब्बा देऊ."



अश्या या संसारात, राधा खुप सुखी होती.दोन नक्षत्रासारखी मुलं,आणि गुणी स्वभावाचा नवरा. 

'माझ्या पूर्व  पुण्याईचं दान, या जन्मी माझ्या पदरात टाकलेस देवा.'  असं म्हणून मनातल्या मनात त्याचे आभार व्यक्त करत होती. 



असेच दिवस जात होते. हल्ली यशवंतरावांना घरी यायला रोजच उशीर व्हायला लागला. राधाच्या हे लक्षातही आली होते. पण 'जाऊ द्या. होत असेल उशीर.. कशामुळे तरी.' असं म्हणून ती दुर्लक्षित करायची. पण नंतर नंतर  ती विचारू लागली. तर ठराविक तीन-चार कारण ते तिला सांगत असे. "ऑफिसमध्ये साहेब ओव्हर टाईम साठी थांबतात.  म्हणून मलाही थांबावे लागते." किंवा "दुसर्याऑफिस मध्ये काहीतरी काम होते. त्यामुळे मी तिकडे गेलो होतो." असेच ऑफिस संदर्भातील कामे सांगून, ते मोकळे व्हायचे. सुट्टीच्या दिवशीही घरी नसायचे. मुलांना बाबासोबत वेळ घालवावासा  वाटे पण छे..!



असेच काही दिवसानंतर त्यांच्या वागण्यातही खूपच फरक पडला. मुलांशी ते बरे वागायचे. पण राधाशी मात्र तुटतपणे वागायला लागले. तिने खूप वेळा विचारले ही.

 'जे आहे त्यात समाधानी रहा'. हेच उत्तर असायचे.


 यामागे नेमके काय आहे हे तिने शोधायचे ठरवले.

 आणि असे कळाले की, त्यांनी दुसरे लग्न करून, संसार ही थाटला आहे.


हे कळाल्यावर राधा सुन्न झाली. तिच्या अंगाचा तिळपापड झाला. सगळं तिच्याभोवती गरागरा फिरत आहे. असा तिला भास झाला. 'काय कमी होती माझ्या संसारात?' असं म्हणून ती स्वतःच्याच डोक्याला हात मारून घेऊ लागली. 'असं काही ऐकण्याआधी माझे डोळे मिटले असते तर, फार बरे झाले असते.' असं क्षणभर तिला वाटू लागलं.


नवऱ्याच्या वागण्यातला तुटकपणा.. आता हळूहळू तिच्या लक्षात यायला लागला.. आणि डोळ्यासमोरून सरकूही लागला. जेवणात त्यांचे लक्ष नसायचे. घरात असले तरी. मन सारखं सैरभैर असायचं.. बाहेरून घरात आल्यावर ,एखाद्या अपराध्या सारखे चेहऱ्यावर भाव असायचे.. मुलांनी कुठली वस्तू आणायला सांगितली तरी. लक्षात राहत नव्हती.. इ. 


राधा चे मन, नाही नाही तो विचार करू लागले. 'आता काय राहिले आयुष्यात? जगून तरी काय करायचे? काय उपयोग आहे? जगतानाही लोकांच्या तिरस्कृत नजरेचा सामना करत करतच जगावे लागेल.' असाच विचार करत.. ती बराच वेळ तशीच बसून राहिली होती. मुले शाळेतून आली त्यांनाही एक शब्दही ती बोलली नाही. उलट "माझी तब्येत बरोबर नाही." असं तिने सांगितलं.


 कारण, हे मनात उठलेले वादळ.. कधीच शांत होणार नव्हते.. उगीच मुलांवर याचा विपरीत परिणाम व्हायला नको म्हणून.. तरीही प्रसाद पेक्षा संध्याच्या मनावर आईच्या या अवस्थेचा जास्त परिणाम झाला. ती आईच्या अवतीभोवतीच वावरू लागली. खेळायलाही गेली नाही.


 थोड्या वेळानंतर राधा तिला म्हणाली, "संध्याकाळचे जेवण तूच बनव, जमेल तसे." तिने 'हो' म्हटले आणि आपल्या कामाला लागली.

 पण.. राधा मात्र आपल्याच विचारातच मग्न होती. सारखाच विचार करूनही डोकं फणफणू लागलं होतं.. अंधार पडूनही बराच वेळ झाला तरी यशवंतरावाचा घरी पत्त्ता नव्हता. तिला उभ्या आयुष्याची चिंता सतावू लागली. 'आता कसं होणार माझं आणि मुलांचं?'


यशवंतराव घरी आल्यावर राधेने आकाश पातळ एक केले.. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पर्यायाने आता कुटुंबाची हेळसांड होऊ लागली. कोणतीच गोष्ट वेळेवर घरात येईना झाली. वाण सामान, भाजीपाला, यासाठी ही वाट पहावी लागत होती. आता  मुलांनाही या सर्व परिस्थितीची कल्पना आलेली होती. ती दोघेही एका दडपणाखाली वावरू लागली.. त्यांचे बालपण संपून त्यांच्या शहाणपण आले होते..


 हे चित्र तिला पहावेना.. पण विलाज नव्हता. तिला स्वतःला संपवता ही येत नव्हते. कारण दोन मुलांचे चेहरे तिलासमोर दिसत होते. असं हे संसाराचे चित्र पाहून राधाचं मन तडफडू लागलं.. म्हणून तिने स्वतःच्या मनाला बांध घातला.आणि ती पूर्णपणे सावरली. स्वतः च भक्कम व्हायचं?नव्हे तिला व्हावेच लागले.


या परिस्थितीत तिला, शिवणकामाचा खुपच आधार मिळाला.


काही दिवसांनंतर, यशवंतरावांना केलेल्या या कृतीचा खूपच पश्चाताप झाला. पण आता ते परत फिरू शकत नव्हते. 'जर तुम्ही मला सोडून जाल, तर मी तुमच्या कुटुंबाची वाट लावीन."अशी तिने त्यांना धमकीच देऊन ठेवली होती.


हळूहळू दिवस जात होते. आता यशवंतराव घराकडे जराही फिरकत नव्हते.  मुलंही मोठी होत होती. प्रसाद कॉलेजमध्ये जाऊ लागला होता पण घरची परिस्थिती पाहून त्याचे मन कॉलेजमध्ये लागत नव्हते. तसाही तो पार्ट टाइम जॉब करतच होता.

 पण बारावीनंतर त्याने फुल टाइम जॉब करायला सुरुवात केली. मग शिक्षणासाठी, अभ्यासासाठी, वेळही त्याला मिळत नव्हता.



आता तर त्याने मोठ्या दुकानात काम करायला सुरुवात केली होती. तिथे त्याला पगारही चांगला मिळत होता. राधाला मात्र या वयात आता जास्त काम होईना.


असे झाले होते. म्हणून सर्व जबाबदारी प्रसाद वरच येऊन पडली होती. योग्य वेळी संध्याचे जवळच्याच नातेवाईकात चांगला मुलगा पाहून लग्न लावून दिले. मुलीच्या  डोक्यावर  अक्षता टाकायलाही यशवंतराव आले नव्हते..


 संध्या आता तिच्या घरी सुखी होती. हे पाहून राधा ला मात्र खूप आनंद झालेला होता. त्यानंतर प्रसादचेही लग्न झाले..त्याला बायको छानच मिळाली.त्याला मुलगा झाला.. घरात नातवंड आले. घराचे पुन्हा गोकुळ झाले.


तेव्हापासून राधाबाईंचा वेळ मजेत जाऊ लागला. त्या मुलाच्या हसण्या खिदळल्याने, घरभर रांगत रांगत फिरण्याने, अगदी घर भरून गेल्यासारखे झाले होते. आयुष्याच्या जखमेवर जरा जरा खपली आल्यासारखे त्यांना वाटत होते.


अशातच दोन माणसे अचानक आली. त्यांनी सुनेजवळ सांगितले की," यशवंतराव हार्ट अटॅकने गेले."


हे ऐकताच,राधाबाई चक्कर येऊन खाली कोसळल्या…


काही वेळाने त्या शुद्धीवर आल्या तेव्हा प्रसाद ही त्यांच्यासमोर उभा होता. पण त्या परत  सारखं सारखं बडबडू लागल्या,

 "नका माझं कुंकू पुसू नका, नका माझे कुंकू पुसू नका."


सौ. शुभांगी सुहास जुजगर.

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

  1. अगदी विचार करण्यासाठी कथा आहे

    उत्तर द्याहटवा
  2. हीच तर चूक करतात स्त्रिया.राधाबाईच म्हणणं बरोबर होतं ज्या नवर्याशी आधारच नव्हता मग ते कुंकू त्यांच्या नावाचे कसे? नकोच पुसायला. मुली लहानपणापासूनच कुंकू लावतात पतीशी त्याचा काहीही संबंध‌‌‌ नसतो

    उत्तर द्याहटवा
  3. छान लिखाण शब्द रचना मनाला भिडणारी व गोष्टीतील गूढ कायम राहिला शेवट पर्यंत

    उत्तर द्याहटवा