भोग सरल, सुख येईल..
कोमलच्या डोक्यावर अक्षता पडल्या, आणि लतिकाला खूपच हलकं हलकं वाटायला लागलं. तिचा एकदाचा जीव भांड्यात पडला.
नवऱ्याच्या मागे तिने संसाराचा गाडा, गेल्या दहा वर्षापासून, तसं म्हणायला पंधरा वर्षापासून तीने चालवला होता. एकटीने दोन मुलं आणि नवरा.
छोटी कोमल सहा वर्षाची झाली. आणि ती घराजवळील बालवाडीतून पहिलीच्या वर्गात गेली. दोन्ही मुले शाळेत जात होती. मोठा मोठा मुलगा कुणाल हा इयत्ता पाचवीत होता. आणि विक्रम म्हणजे तिचा नवरा हा खाजगी ऑफिसमध्ये काम करत होता. तो कधीकधी डब्बा घेऊन जायचा, तर कधी कधी जेवायला घरी यायचा.
असं सगळं एकुन छान कुटुंब. आनंदी आनंदाने राहत होते. दोन्ही मुले शाळेत गेल्यामुळे लतिकाला घरी एकटे एकटे वाटायला लागले.सासु बाई या मध्यंतरी अल्पशा आजाराने देवाघरी गेल्या होत्या.आणि घरातील पैशांची ओढाताण ही तिच्या लक्षात येत होती. खर्च वाढला होता.
म्हणून मग तिने धाडस करून लेडीज गारमेंटच्या फॅक्टरी मध्ये काम मिळवलं.आणि मग ती दररोज तीथे कामासाठी जाऊ लागली. तर तिचे हे बाहेर पडणे मात्र विक्रमला आवडले नाही. पण चार पैसे येत होते. म्हणून तोही गप्प बसला. तेवढाच संसाराला हातभार होत असे.
पुढे काही दिवसांनी विक्रमला मित्रांच्या सोबतीने संगतीने दारूचे व्यसन जडले.आणि ते हळूहळू वाढतच गेले. त्यामुळे त्याचे ऑफिसचे कामही गेले.कारण तो पीऊनच ऑफिसमध्ये काम करण्यासाठी जाऊ लागला. त्यामुळे त्यांनी कामावरून कमी केले. मग काही दिवस तो असाच इकडे तिकडे फिरला. त्यानंतर मग असे कुठेतरी रोजंदारीवर काम करून, पैसे कमवायला लागला.
घरात मुलं मोठी होत होती. त्याप्रमाणे गरजाही वाढत होत्या. पर्यायाने खर्च वाढत होता. म्हणून मग सहाजिकच लतिकाची चिडचिड वाढत होती. कारण कोणतीही गोष्ट मुलं तिच्याकडेच मागत होती. अशा या परिस्थितीचा तीला खूप खुप वैताग आला. तीही खूप सावरण्याचा प्रयत्न करत होती पण.. तो सावरल्या जात नव्हता.कारण विक्रमचे बेताल वागणे होते.
कोणतेही कारण नसतानाही तो मुलांना मारत होता.त्यांच्यावर ओरडत होता.या सर्वांचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होत होता.त्याच बरोबर आता तो लतिकालाही मारहाण करून सारखेच भांडण करू लागला.त्याच्या अशा या वागण्यामुळे मुलं घरात यायला घाबरायला लागली.
या अशा विपरीत परिस्थितीला कंटाळून ती मुलांना घेऊन माहेरी निघून गेली. माहेरी दोन भाऊ आई-वडील आणि मोठ्या भावाचे लग्न झालेले होते.आणि तो नोकरीच्या गावी राहत होता.एवढी मोठी फॅमिली होती. तिकडे गेल्यानंतर चार दिवस खूप सुखाची गेली.कारण तीने माहेरी कश्यामुळे आले आहे? हे आईला बाबांना सांगितले नाही. कारण त्यांना वाईट वाटू नये म्हणून..
त्यानंतर लहान भावाला बघण्यासाठी पाहुणे आले आणि आले तर ते लग्न ठरवूनच गेले. त्याचे लग्न ठरले, पण हिच्या काळजात चर्र झाले. उद्या भावजय आल्यानंतर म्हणायची, “माझे सर्व काम तुम्हीच करा, माहेरीच तर राहता.”
शिवाय आता पाहुण्यांचा राबता सारखाच राहणार आहे लग्नापर्यंत प्रत्येकाला सांगावे लागेल की मी…..?”
एकंदरीत हा सर्व विचार करून तिने तीथे राहण्याचा विचार कॅन्सल केला. आठ दिवस माहेरपण करून ती परत आपल्या घरी आली.
आणि दोन्ही मुलांना सांगून ठेवले की,’ बाबा काहीही म्हणाले तरी फक्त वापस बोलायचे नाही.’
परत आल्यावर तिने तिच्यासाठी दुसर्या ठिकाणी काम शोधलं.जरा जास्त पगाराचे असलेले.
संध्याकाळी कामाचे पैसे आले की विक्रम पिऊनच घरी यायला लागला. थोडेसे पैसे तो घरी देऊ लागला. पीने वाढल्यामुळे विक्रमला काम व्यवस्थित करता येत नव्हते. त्याचा परिणाम तो करत असलेल्या कामावर झाला. कारण सगळ्यांच्या पाठीमागे हा राहू लागला. दिवसासाठी ते जेवढे काम द्यायचे तेवढे याच्याकडून होत नव्हते. त्यामुळे तेही काम सुटले.
काम सुटले पण पीने मात्र सुटत नव्हतं. काम नसल्याने पैसे नव्हते. तर तो आता लतिकाकडे पिण्यासाठी पैसे मागू लागला. नाही दिले तर खूपच धिंगाणा करू लागला. इतका की शेजारील लोकांनाही त्या गोष्टीचा त्रास होऊ लागला.’आहे त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देत राहाणे’ हेच ब्रीद तीने मनावर कोरले होते. या सर्व गोष्टींचे वाईट वाटणे तीने सोडून दिले होते.याच आशेवर की ‘माझी उद्या, नक्कीच उज्ज्वल असेल.’
त्यादिवशी रात्रीचे दहा वाजले होते छोटी कोमल जेवण करून झोपी गेली होती. पण कुणाल मात्र जागाच होता. लतिकाही तीन तीनदा घड्याळ बघत होती. “आई, बाबा आले नाही का अजून?” असा कुणालने प्रश्न विचारला.
त्याच्या प्रश्न ऐकून तिने त्याला जवळ घेतले, आणि त्याच्या डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवत म्हणाली,” तू झोप बाळा, सकाळी शाळेत जायचे आहे ना. येतील ते, मी आहे जागीच.” असं ती म्हणाली. आणि तिच्या डोळ्यातून अश्रु ओघळले.ते हाताने पुसत कुणाल म्हणाला,” आई तू रडू नको ना अजून.”
“कुठे रडते आहे रे? हे काय डोळ्यात काहीतरी गेले आहे माझ्या.” असं ती लगेच आपले डोळे पदराला पुसत म्हणाली. आणि तीने त्याला थोपटून थोपटून झोपी घातले. मात्र तिला झोप येत नव्हती.
तिचे विचार चक्र सुरू होते. ‘किती छान चित्र रंगवले होते मी लग्ना अगोदर संसाराचे!’
सुखी संसार म्हणजे प्रेम, समजूतदारपणा, आणि सहकार्याने भरलेले जीवन. संसाराच्या गाड्याची दोन चाकं म्हणजे पती-पत्नी, ज्यांच्यात परस्पर प्रेम, आदर, आणि विश्वासावर संसार टिकून राहतो. सुखी संसारात संवाद महत्त्वाचा असतो; एकमेकांचे विचार, भावना, आणि समस्या समजून घेतल्यामुळे हे नाते घट्ट होते.
संसारात आर्थिक स्थैर्य जरी महत्त्वाचे असले तरी त्याहून महत्त्वाचे असते एकमेकांसोबत वेळ घालवणे, एकमेकांची काळजी घेणे, आणि एकमेकांच्या स्वप्नांना पाठिंबा देणे. समस्यांना सामोरे जाताना संयम आणि समजूतदारपणाची भूमिका घ्यावी लागते.
सुखी संसारात आपल्याला केवळ वैयक्तिक सुख नको, तर संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणाची देखील चिंता असते. त्यात मुलांचे संगोपन, त्यांच्या शिक्षणाची काळजी, एकमेकांना आनंद देण्याचा प्रयत्न करणे हेदेखील सुखी संसाराचे लक्षण आहे.
पण हा कसा संसार वाट्याला आला आहे? दोन गोड लेकरं पदरात होती परंतु नवरा..?
या दोन मुलांमध्येच तर जीव गुंतला होता तीचा.
सहजच विचार करत असताना तिला लग्नानंतरचा तो प्रसंग आठवला.नवरा कीती समजुतदार मिळाला ोआहे आपल्याला? तेव्हा असे वाटले होते.पण हा समजुतदार पणा नंतर कुठे गायब झाला कोण जाणे?
त्या दिवशी..
सायंकाळची वेळ होती लतिकाच्या सासूबाई नुकताच आवरून हरिपाठाला गेल्या होत्या. नुकतीच लग्न झालेली लतिका आणि विक्रम यांना घरात जरा शांत असा एकांत भेटला होता. याच शांत वातावरणात दोघीही चहा पीत बसले होते.
लतिका म्हणाली,”आपलं लग्न खूपच पटकन झालं, नाही? कधीच फोनवर बोलून मनं जुळवण्याचे आपण प्रयत्न केले नाही. तर तसा वेळ ही नाही मिळाला.”
“मीही खूपच पटकन हा लग्नाचा निर्णय घेतला. राणीच्या लग्नात आपली भेट झाली. आणि लगेच अशी काही सुत्र हालली की, एका महिन्याच्या आतच आपणही विवाह बंधनात अडकले गेलो.” स्वतःशीच हसत विक्रम म्हणाला.
“सुरुवातीला मला थोडं विचित्र वाटलं. कारण आपल्याला एकमेकाबद्दल फार काही माहित नव्हतं पण तरीही आपण….?”लतिका.
तिचे बोलणे मध्येच थांबवत तो म्हणाला,
“अगं आयुष्याचं हे असंच असतं, काही निर्णय आपण घेतो, तर काही निर्णय ती नियती घेऊन मोकळी होते. मग त्यानुसारच आपले आयुष्य आकारत जाते. नियतीच्या त्या तिच्या निर्णयानुसारच आपल्यालाही वळावंच लागतं. हा.. हे मात्र नक्की की, हे नाते ही आपण सुंदर बनवू शकतो. म्हणजेच आपण यातही खूप आनंदी आणि समाधानी नक्कीच राहू शकतो.”त्याच्या बोलण्यातला आत्मविश्वास
तीला भारावुन गेला.
“नक्कीच तुमची साथ मला खूप मोलाची आहे. ती माझी प्रत्येक चिंता दूर करते. आणि आता हा प्रवास फक्त आपलाच आहे.” चहाचा कप खाली ठेवत लतिका म्हणाली.
त्यानंतर दोघेही खिडकी जवळ येऊन उभे राहतात. बाहेरील शांत सुंदर वातावरण बघून दोघांनाही छान वाटते.म्हणूनच दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि दोघेही म्हणतात, “आपण दोघे या नात्याला सुंदर बनवू, हळूहळू एकमेकांना समजून घेऊ. फक्त तुझ्या माझ्या प्रेमाने प्रेमाने..”
हे आठवल्यावर ती स्वतःशीच हसली.
यानंतर तीला केव्हा झोप लागली, हे तीलाही नाही कळले.
सकाळीच कुणीतरी येऊन बातमी सांगितली,”की कुणालचे बाबा रात्री अपघातात गेले.”
या बातमीने लतिकाची आशाच मावळली की’आज नाही तर उद्या ही व्यक्ती सुधारेल म्हणुन…”
असेच दिवस जात होते.लतिकाने तिच्या अल्पशा कमाईचे मुलांना शिकवले.कुणाल हा टेक्नीकलचे शिक्षण घेऊन चांगल्या कंपनीत जॉबला लागला.त्यमुळे तीला मोठाच आधार मिळाला.
यानंतर मग कोमलसाठी छानसं स्थळ बघुन तिने लग्न लावून दिलं.त्यानंतर जवळच्याच नात्यातील मुलगी बघुन कुणालचेही शुभमंगल झाले.
या नंतर मात्र तिला मुलाने आपल्या बरोबर म्हणजेच नोकरीच्या गावी नेले.
(ही संपूर्ण कथा काल्पनिक आहे.)
@सौ. शुभांगी सुहास जुजगर.
0 टिप्पण्या