फॉलोअर

ओंजळ भरली सुखाने..

  ओंजळ भरली सुखाने..

अर्पिता तिची तर सर्व कामे आवरून, किचन मध्ये गेली. तिच्याकडे आज दुपारचा स्वयंपाक होता. सर्व स्वयंपाक करून तिला साडेअकराला शाळेला निघायचे होते.
दुपारी बाराला तिची शाळा भरत होती. आणि तिची जाऊ म्हणजे सुषमा. या दोघीही शाळेवर शिक्षिका होत्या. म्हणून मग एक दिवस तिच्याकडे स्वयंपाक असायचा आणि एक दिवस हिच्याकडे. रात्रीचा मग दोघी मिळून करत होत्या.
घरात म्हणजे यांचे सासू-सासरे आणि सुषमाची दोन मुलं म्हणजे शाश्वत आणि शुभ्रा. अर्पिता आणि तिचे मिस्टर म्हणजे कृष्णा. असा एकूण सात जणांचा हा परीवार होता.
सुषमाची दोन्ही मुले सकाळीच सातला डबा घेऊन शाळेत जायची. त्यांचा डबा सुषमा करून देत होती.यांची शाळा बाराला सुटत होती.
आणि मग दुपारी ती दोन्ही मुलं घरीच असायची.
या दोघी शाळेत जायच्या.तर या दोघीही साडे अकरा ला जेवण करूनच शाळेत जात असत.त्यामुळे सर्वच जण या वेळीच जेवण करत होते.
अर्पिताच्या लग्नाला जवळ जवळ पाच साडेपाच वर्ष कम्प्लिट झाले होते. पण तिला अजून आई होण्याचे भाग्य लाभले नव्हते. ट्रीटमेंट चालूच होती, पण गेल्या वर्ष दीड वर्षापासून ट्रीटमेंट मध्ये जरा हयगयई झाली होती. ती म्हणजे अचानकपणे अर्जुनचे जाणे. म्हणजेच सुषमाचे पती, अर्पिताचे मोठे दीर होते. यांचा अचानक अपघातात मृत्यू झाला होता.या धक्क्याने संपुर्ण घरांचं घरपण हरवलं होतं. 
काही दिवसांनंतर सुषमाने मुलांकडे बघुन स्वतः ला सावरले.आपण जर या विश्वातुन बाहेर नाही पडलो तर मुलांचे भवितव्य अंधकारमय होईल, असे तिला वाटले,
’नाही सुषमा नाही, तुला असं थांबुन चालणार नाही’ याच विचाराने मग ती पुन्हा शाळेला जाऊ लागली. ती स्वतः ला सावरून पुन्हा नॉर्मल आयुष्यात परतली आहे.हे पाहुन घरातील सर्वांना समाधान वाटत होते.परंतु तिला कोणीही शब्दाने दुखवत नव्हते.मुलांची तर सर्व जण खुप काळजी घेत होते, प्रसंगी लाड ही करत होते.
काळा सारखं दुसरं औषध नाही. हळूहळू हे दु:ख हलकं होत गेले. 
******
आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.
दीड वर्षानंतर..
एके दिवशी संध्याकाळी या दोघीही किचन मध्ये काम करत होत्या. सासुबाई म्हणजे मंदाताई या आपल्या देवासमोर दिवा लावून हरिपाठ म्हणत बसल्या होत्या. मुलं बाहेर खेळत होती सासरे बाहेरच ओट्यावर बाज टाकून बसले होते.
किचन मध्ये स्वयंपाक करत असताना अर्पिताने भाजी फोडणीला टाकली आणि तिला एकदम चक्कर आल्यासारखे झाले.त्यामुळे ती पुढील रूममध्ये आली आणि बेडवर झोपली.
लगेच सुषमा तीच्या मागे गॅस बंद करून आली. आणि
 “काय होतं आहे तुला अर्पिता?” असा तीने प्रश्न विचारला.
त्यावर अर्पिताने उत्तर दिले,”काही नाही हो, थाडेसे चक्कर आल्यासारखे वाटले म्ह्णुन ..”
“दुपारी पण आज व्यवस्थित जेवली नाही तू.”
“होना.” अर्पिता.
“तुला मी लिंबू सरबत आणुन देते ते घे मग बरं वाटेल.”असं म्हणून सुषमा किचन मध्ये आली.
सुषमाने लगेच तीला सरबत आणुन दिले.
“हे पी म्हणजे बरे वाटेल.”
लिंबू सरबत घेऊन ती परत झोपली.
काही वेळे नंतर कृष्णा घरी आला.त्याला आईने लगेच “अर्पिताला आधी डॉक्टर कडे घेऊन जा.” असे सांगितले.
रात्रीचे नऊ वाजले होते. या दोघांना म्हणजे अर्पिताला आणि कृष्णा हॉस्पीटल मधुन घरी यायला.अशक्त पणा आल्या मुळे तीला सलाईन लावले होते.
दोघेही घरी आले तर हॉल मध्ये सगळेजण या दोघांची वाट पाहत बसले होते.कृष्णाच्या हातात पेढ्यांचा बॉक्स होता.
घरात आल्यावर दोघांनीही आई बाबांना नमस्कार केला.आणि दोघांच्याही हातावर पेढा ठेवत कृष्णा म्हणाला,”तुम्ही दोघे आजी आजोबा होणार आहात.”
“वा वा, खुपच गोड बातमी दिलीस रे, मग आधी पेढा देवाला ठेवा, आणि दोघेही नमस्कार करा.”आईने सांगितले. 
पण हे सांगताना तिचे नेत्र काठोकाठ पाण्याने भरले होते आणि तिच्या सहित सर्वांनाच खूप खूप आनंद झाला होता,हे ऐकून.
अर्पितालाही ही बातमी ऐकून खूपच आनंद झाला होता. ती जणू चातकासारखीच या क्षणाची वाट पाहत होती.तीची इच्छा आज पुर्ण झाली होती.तो क्षण आज तिला अनुभवायला मिळाला होता.
****
आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.

दिवस जात होते तसं हळूहळू म्हणजेच चंद्राच्या कलेकलेप्रमाणे अर्पिताचा गर्भ वाढत होता. तस तसे अर्पिताच्या देहाला जडत्व येत होते.


रोजच्या जेवणात काहितरी आंबट तिला लागायचे.एकदा मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवार होता म्हणुन मग मंदा ताईने काही गोड असावे यासाठी इम्रती आणायला सांगितली.ती अर्पिताने आवडत नव्हती तरीही खाल्ली.
त्यानंतर मग तिने आणखी दोन तीन वेळा कृष्णाला आणायला सांगितली.डोहाळे म्हणुन तोही आनंदाने हे पुरवत होता.
एके दिवशी म्हणजे रविवारी सकाळी, “अहो ऐका ना, आजही मला तुम्ही दुपारी येताना इम्रती घेऊन या ना, मला खावीशी वाटते आहे.”अर्पिताने कृष्णा ला सांगितले.
हे सांगताना ते नेमके कृष्णाच्या वडिलांच्या कानावर पडले.आणि त्यांना आपल्या बायकोचे डोहाळे आठवले. तिनेही यांना अर्जुन च्या वेळी गरोदर असताना हीच म्हणजे इम्रतीच आणायला सांगत होती.. ऐकुन त्यांच्या काळजात चर्रर्र झाले.
पण त्यानी कुठेही हे सांगितले नाही.
त्यांनी दुपारी मात्र न विसरता, इम्रती आणली.आणुन अर्पिताच्या हातात दिली. आणि तिला म्हणाले,”तुला पाहिजे तेवढी घे खा, खास तुमच्यासाठीच आणली आहे.”
सासर्यांच्या नजरेतला भाव तीने ओळखला, त्यामुळे तिला लाजल्या सारखे झाले.अन् ती मनात म्हणाली,’ह्यांना कसे कळले हे?’
******
अर्पिता ला आता नववा महिना होता.तर तीने या महिन्या पासुनच शाळेला रजा दिली. कारण तिला वर्गावर शिकवणे अवघड होऊ लागले होते.
 त्यानंतर ती माहेरी आली होती. बाळंतपणा साठी…
योग्य वेळी अर्पिताने एका छान गोंडस बाळाला जन्म दिला.
ज्या दिवशी सगळा भारत देश,रामलल्ला च्या प्राण प्रतिष्ठेच्या सोहळ्यात मग्न होता,त्याच गडबडीत हिला मुलगा झाला होता.
ती एका बाळाची आई झाली होती. त्या बाळाच्या छातीवर इवलुशी जन्म खुण होती.ती म्हणजे धनुष्यबाणाच्या आकृतीसारखी.
सासर माहेर जवळच होते. म्हणजे एक तासाच्या अंतरावर. लगेच कृष्णा आईला घेऊन अर्पिताला आणि बाळाला बघायला आला. सासूबाईने लगेच बाळाला मांडीवर घेतले.
अर्पिताला तर झोपेने घेतलेले होते. म्हणजे तिला भूल दिलेली होती. आणि रात्रभर ती वेदनेने गलित रात्र झाली होती. तिची आई वडील आणि बहीण रात्रभर दवाखान्यातच होते. पण आता अर्पिताच्या सासूबाई आल्या, म्हणून मग त्या दोघी घरी गेल्या होत्या.
त्यांनी बाळाला मांडीवर घेतले आणि घेतल्या घेतल्या त्यांनी त्या बाळाच्या छातीवरची ती जन्म खुण बघितली.आणि त्यांनी बाळाला छातीशी कवटाळले.त्यांना हुंदका अनावर झाला.हे असं बघुन कृष्णा ला काहिच कळेना? नेमके काय झाले आहे.म्हणुन त्याने विचारले,”आई, काय गं हे? ही वेळ रडण्याची नाही ना.”
यावर त्या म्हणाल्या,”हो रे खरेच आहे बघ.पण हे बघ ना जरा ,या बाळाच्या छातीवर माझ्या अर्जुनच्या छातीवर होती तशीच जन्मखुण आहे.” हे सांगताना त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. आणि अश्रुही डोळ्यात मावत नव्हते,ते डोळ्यातुन ऊतु जात होते.कृष्णानेही मग हे बघितले.आणि त्यालाही आश्चर्याचा धक्काच बसला.

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.
“माझा अर्जुन परत आला आहे कृष्णा, माझा अर्जुन परत आला आहे.तुझ्या बाळाच्या रूपाने.” 
असं म्हणत ती माऊली कृष्णा च्या खांद्यावर डोके ठेवून खुप वेळ रडत होती.
जणु आजपर्यंत मनात कोंडलेल्या दु:खाला, अश्रुंना वाट मिळाली होती.घरात सुषमा समोर स्वतःचे दु:ख त्या आज पावेतो लपवतच आल्या होत्या.कि तिला वाईट वाटुन नये म्हणुन…
आईची ही अवस्था पाहुन तोही एकदम गडबडुन गेला होता.पण हळुवार पणे त्याने सावरले.
संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये, भगवान रामचंद्राच्या प्राण प्रतिष्ठेच्या शुभ दिनी म्हणजे 22 जानेवारी या दिवशी जन्म झाला म्हणुन,डॉक्टर अन् संपूर्ण स्टॉप ने या बाळाचे आणि बाळाच्या आईवडिलाचे विशेष कौतुक करून, बहुमोल असे गिफ्ट ही दिले.
या क्षणी दोघांनाही म्हणजेच नव्या आई बाबांना अगदीच भारावल्या सारखे झाले होते.
‘आयुष्यात एक परिपूर्णता आली आहे’ अशी भावना तेव्हा दोघांच्याही चेहऱ्यावर झळकत होती.
(ही कथा पुर्णपणे काल्पनिक आहे.)

@सौ.शुभांगी सुहास जुजगर.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या