फॉलोअर

मातीतलं सोनं...

           मातीतलं सोनं...


 "अगं येऽ रखमा, झालं का नाही लवकर बांध भाकर. बाजाराला जायला उशीर होतोय.." शंकरने बाहेरूनच रखमाला आवाज दिला.


"झालं झालं.. वाईच थांबा जरा.." रखमा म्हणाली.


"बरं बर, अगं रखमे सुगंधी कुठं दिसत न्हाय ती."


 "घास कापायला गेली. तुमच्या आक्काबाई बरोबर. मलाच चला म्हणल्या होत्या... पण पोरगी म्हणली,


 तु एक दिवस घरी राहा.मी जाते."


"बंड्या भी दिसत न्हाई. "


"त्यो शाळेत गेला."


भाकरी बांधत बांधत रखमा नवऱ्याला म्हणाली.


"आव म्या काय म्हणते,"
"काय म्हणता सांगा! बोला की."


 "जरा सुगंधी च्या लग्नाचे बघावं म्हणते.. बघत बघत वरीस, सहा महिने जतील निघून.. आता झाली की अठरा वर्साची.. कव्हर थांबायचं.."


 "बर, आज देवराम भेटला की विचारतो त्याला.. एक पोरगा आहे म्हणाला होता.. तो शहरात कंपनीत नोकरीला हाये."


"पहा विचारून मग.. जमलं तर टाकू उरकून यंदाच्या वैशागात."


"बरोबर.. अगं मला काळजी आहे लेकराची.. चांगली गोरी, नक्षत्रासारखी लेक हाय माझी.. पोरगा चांगलाच बघतोय मी."


 असं म्हणून शंकर भाकरी घेऊन बाजाराला निघून गेला.


रानातलं थंडगार वार.. सुई सुई करणारा आवाज.. मधुनच पक्षांचा किलबिलाट.. आणि प्रसन्न वातावरण.. यामुळे कामाला हुरूप येत होता.. सुगंधाही इतर जणीं सोबत चढाओढीने घास कापत होती. घास म्हणजे.. हिरवा चारा मेथीच्या भाजी सारखा दिसतो.. सहसा ती शेतात जास्त येत नव्हती.. घरीच राहून घरचेच करत होती.. पण आज आत्या होती, म्हणून आईने पाठवले होते. फक्त, जर आई घरच्या शेतात गेली.. तरच ती जात असे. शेतातील कोणतेही काम असू द्या. ती. नाही म्हणत नव्हती.. घरचे ही सर्व ती करत होती. शिक्षण सातवीपर्यंत झाले. कारण गावात शाळा तेवढीच होती. दुसऱ्या गावी तिला शिक्षणासाठी पाठवले नव्हते.
 आबासाहेबांचा मुलगा म्हणजे निलेश.. आबासाहेब म्हणजे शेतमालक..


निलेश हा दीपावलीच्या सुट्टीसाठी गावाकडे आलेला होता.. त्यामुळे आज तो शेतात आला होता.. शहरात नोकरीला होता.. पण गावी आला की आवर्जून शेतावर येत असे.. शेतातील धुंद हिरवळ.. वाऱ्याबरोबर डोलणारे पीक.. हे जणू त्याला शीळ घालत असे.. आबासाहेबांनी, त्याचे शिक्षण करून, शहरातच नोकरीला लावले होते. शेतीही होतीच.. 


पण "मी जे करतोय तेच, मुलाने न करता, नोकरी करावी.." ही त्यांची मनीषा.
शहरातल्या कोंंदट हवामानाचा..विसर पडावा.. म्हणून मनसोक्त निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी.. आज सकाळीच निलेश शेतात आला होता. काम करणारे नोकऱांवर आणि शेतीत काम करणाऱ्या वर, लक्ष ठेवायचे होते.. घास कापून तो लगेच बाजारातही पाठवायचा होता.. हळूहळू तो शेतीची पाहणी करू लागला.. असे करता करता, कुठूनसे गीताचे मंजुळ स्वर त्याच्या कानी पडले.. म्हणून तो इकडे तिकडे पाहू लागला.. तर हे स्वर घास कापत असलेल्या ठिकाणाकडून येत होते.. म्हणून तो तिकडे निघाला.. तर आवाज थोडा ओळखीचाही वाटला.. मंदिरात जो कार्यक्रम झाला होता, त्यामध्ये सुंदर अभंग, 
"वृक्षवल्ली आम्हा सोयरे। वनचरे वृक्षवल्ली, आम्हा सोयरे।"


 हा त्याने ऐकलेला त्याला आठवला.. तो एका मुलीने म्हटला, असे आईने सांगितले होते. अधिक खात्री करून घ्यावी.. म्हणून घास कापणार्या बायांकडे तो गेला, आणि,"कोण गाणं म्हणते?" असा प्रश्न ऐकून सगळ्या उभ्या राहिल्या. मग सुगंधी च्या आत्याने सांगितले. "आमची सुगंधी गाणं म्हणत होती." असं ऐकल्यावर सुगंधा हातात वीळा तसाच घेऊन.. आत्या जवळ येऊन थांबली.. "ही हाय मालक."


आत्याबाई ने सांगितले.


 "छान म्हणतेस गाणं.. तु कुठे शिकलीस?" असे निलेशने तिला विचारले. समोर एक चवळीच्या शेंगे सारखी नाजूक.. लांब सडकदेहाची.. गोरी गोरी.. सोज्वळ हसऱ्या चेहऱ्याची.. सुगंधा उत्तर देईस्तो वर निलेशने तिचे निरीक्षण केले..


 तिने नुसतीच नकारार्थी मान हलवली..


"मंदिरात तुम्हीच म्हणाला होतात ना? वृक्षवल्ली.."


निलेशने विचारले.


"अंऽऽ हो.." असं ती म्हणाली. 


"आणखी चांगलं म्हणायला शिका.. शिक्षण किती झाले?"निलेश..


"सातवी झाली आहे." आत्या म्हणाली.
मार्च महिना होता. सलग चार दिवस सुट्ट्या.. म्हणून निलेश गावी आला होता. जेवण करून टीव्ही पाहत तो बसला होता.


एवढ्यात निर्मलाताई. म्हणजे निलेशची आई.. सर्व आवरून, छान तयार होऊन त्याच्या समोर आल्या.आणि त्याला म्हणाल्या."निलेश मला लग्नाला जायचे आहे. तू घेऊन चल ना मला. तुझे बाबा गावाला गेलेले आहेत. नाहीतर आम्ही दोघेही, लग्नाला जाणार होतो."
"कोणाचे लग्न? आणि कुठे आहे?" निलेशने प्रश्न केला. "सुगंधाचे लग्न आहे. मंदिराच्या कार्यालयात चल." 


 म्हणून त्याने गाडी काढली.


दोघेही मंदिरातील कार्यालयात पोहोचले. पण तिथे गेल्यानंतर.. गडबड गोंधळ.. कलकलाट, हल्ला गुल्ला.. असा लग्नाचा थाट दिसला नाही. चौकशी केली तर कोणीच काही सांगेना.. म्हणून सुगंधाच्या आईलाच विचारावे. असे निर्मला ताईला वाटले. तिकडे गेल्यावर सुगंधाच्या आईने सांगितले,


"मुलगी खेड्यातली आहे, आणि अडाणी आहे म्हणून नवरदेव लग्नाला नाही म्हणतोय."
"मग त्याला आधी कळत नव्हते का?"असं निर्मलाताई म्हणाल्या.


"बघाना.. जीवाचा आटापिटा करून, एवढा डोलारा उभा केलाय महिना झाला आहे, तसं.. हे कर, ते कर, हे आण ते आण. काडी काडी जमाविता आमची नाकी नऊ आलेली आहे. आणि आताहे पोरगं नाही म्हणत आहे.हळद लावलेली पोरगी तशीच ठेवायची का? काय काय बी कळंना झाले बघा.."
थोडं थांबुन, पुन्हा रखमा म्हणाली," समजूत काढायला गेलेत समदे बघू काय होतं ते.."
निलेशला हे सर्व समजल्यावर वाईट वाटले.आणि हे असे होऊ नये म्हणुन आपणही प्रयत्न करायला पाहिजेत ..कारण हा गावचा प्रश्न होता. 
मुहूर्ताची वेळ जवळ येत होती..मांडवातून एकेक करून लोकं निघुन जाऊ लागली. नवरदेव मात्र लग्नाला तयारच होत नव्हता.
असं हे चित्र पाहून...


भर मांडवात नवरीच्या वडिलांनी सांगितले,"दुसरा कोणी पोरगा माझ्या पोरी बरोबर लग्नाला तयार असेल तर त्याने पुढे यावे.हात जोडून कळकळीची इनंती हाय."असं म्हणताना शंकरचे डोळे भरून आले होते.
चिडीचूप शांतता..कोणताही युवक पुढे येईना...वरबापाच्या आणि वरमाईच्या काळजाची धडधड वाढतंच होती..


इतर पाहुणे मंडळी त्यांची समजुत काढत होती..


"आज माझी पोरगी हळदीच्या अंगाने तशीच राहाते की काय !!"


हा प्रश्न त्यांच्यासमोर आऽऽ


करून उभा होता.
निलेशच्या मनात कालवाकालव सुरू होती..या प्रसंगातून काय मार्ग काढावा.. याचा शोध तोही घेतच होता..एकंदरीत परिस्थिती पाहता बळेच कोणाला लग्नाला तयार करावे..


सुगंधाने गायलेल्या अभंगाचे सुर निलेशच्या 


 मनात घोळत होते.."वृक्षवल्ली आम्हा सोयरेऽऽ.."  


वृक्षवल्ली आम्हा सोयरे.. तर मग आपण का नाही सोयरे.. तिचे ते सोज्वळ रुप.. त्याला फिरून फिरून आठवत होत.. विचार चक्र सुरु होते.. नेमका काय अर्थ..


तिचं गाणं हे शेतात ,गावात न राहता शहरात गेलं तर.. तिथूनही आणखीन पुढे.. मग ते एका वेगळ्याच उंचीवर जाईल..


ठरलं तर मग..
आणि त्याने आईला बोलावून ही कल्पना सांगितली. प्रथम त्या नाहीच म्हणाल्या.पण..निलेशने व्यवस्थित समजावून सांगितले.


"आयुष्य तुझं आहे..मी नाही काही म्हणणार..तशी मलाही ती आवडते."


"हो का..चल मग लाग तयारीला."
निर्मलाताई ने लगेच रखमा आणि शंकरला सांगीतल. आणि नवरीलाही विचारले.


"काय गं माझ्या निलु बरोबर लग्न करायला आवडेल का?" 


सुगंधा एकही शब्द बोलली नाही.फक्त मानेनेच तिने होकार दिला..
आणि क्षणात दाटलेले मळभ पांगले आणि स्वच्छ असा सुंदर प्रकाश पडला..


अन् सनईचे सुर घुमू लागले..
 वार्‍यासारखी ही बातमी पसरली.. निलेशच्या या लग्नाचे सर्वांना प्रश्नांकित आश्चर्य वाटु लागले..
निर्मलाताईने पटापट घरातले दागिने काढले..मेन म्हणजेच मंगळसूत्र, तर ते आबासाहेबांनी त्याच्या लग्नाची तयारी म्हणून करूनच ठेवले होते..
लग्न सोहळा थाटात पार पडला..
सुगंधाची आता निशिगंधा झाली होती..
काही दिवसांनी ती शहरात आली..आल्यावर संगीताचे क्लास सुरू झाले. बरोबर अभ्यास ही..


तिनेही मनात जिद्द निर्माण केली..ही संधी आपल्याला मिळाली आहे..तिचं सोनं करायचंच..आपला आवाज गोड आहे..हे तिला माहीत होते..पण कधीच कोणाजवळ तिने व्यक्त केले नव्हते..
दिवस जात होते..तिचं शिक्षण आणि संगीताचे क्लासेस चालुच होते..अगदि थोड्याच दिवसात तिनं गायनात चांगलंच प्रभुत्व मिळवले होत..
एक दिवस...


 सकाळी आबासाहेब आणि निर्मलाताई चहा पीत बसले होते.. एवढ्यात फोन आला.


"हॅलो बोला, आज सकाळीच आठवण झाली."


निर्मलाताई म्हणाल्या.


"हं आई ,बाबा तुमच्या सुनेची 'सारेगमप' या कार्यक्रमात पहिल्या पाचात निवड झाली आहे.रात्री उशिरा कळाले ,म्हणुन सकाळी सकाळीच फोन करून गुडन्युज दिली ."


निलेशने सांगितले.


"वा वा छान. नाव काढले म्हणायचे सुनबाईने."


 आबासाहेबां नी आनंद व्यक्त केला.


"दे ,सुनबाई कडे दे फोन..अभिनंदन बरं का बाळा तुझं.."


"तुमचे आणि आईचे आशिर्वाद माझ्या सोबत आहेत. आणि हे म्हणजे मूर्तिमंत प्रेरणा आहेत. म्हणुनच मी इथपर्यंत आले आहे. खुप खुप आभारी मी तुम्हा सर्वांची."असे म्हणताच तिला हुंदका दाटून आला.


"तुम्हा दोघांचे खुप खुप अभिनंदन. तुमच्या प्रयत्नांना भरभरून यश मिळालेले पाहून खूप आनंद होत आहे." निर्मलाताई चेही डोळे आनंदाश्रू ने भरले होते.
सौ. शुभांगी सुहास जुजगर. टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या