राधा ही बावरी.. भाग दोन
काही दिवसांनंतर,
त्याचा रविवारी फोन आला.तर हिने उचललाच नाही.तीन चार मिस कॉल झाले.
मग दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याने फोन केला.
आज मात्र तीने फोन घेतला.
“काल कुठे होतात मॅडम?”
“इथेच होते.”तीने सांगितले.
“मग फोन का नाही उचलला.?”त्याचा प्रश्न.
“हो ते.. “
“काही कार्यक्रम होता का?”
“हो, ते पाहुणे आलेले होते.मला बघण्या करिता.”तीने जरा घुश्शातच सांगितले.
आता पुढे..
“हो का? मग आवडला का?”त्यानेही मग तीला छेडीत विचारले.
“मला नाही आवडला तो चष्मीश,
‘कहीपे निगाहे, कहीपे निशाणा.’ असाच दिसला तो.”तीने तणतणत सांगितले.
“बापरे अवघड आहे सारे.”तो.
“काय म्हणालास?”तीचा प्रश्न.
“काही नाही, काही नाही.” सर्व काही जीभेवर असुनही तो काहीच बोलला नाही.
मग आणखी इतरही बोलणं झालं.
आईच्या ही गोष्ट लक्षात आली.
मग तीने विचारलेच.”कोन गं हा मुलगा? एवढं हक्काने विचारत आहे?”
“अगं तोच ना मी आणि अमोल त्यादिवशी ज्याला भेटलेलो.”
पण आईने चांगलेच ओळखले होते की, ‘ही नक्कीच त्याच्या प्रेमात पडली आहे.’
“हा तोच आहे ना गं ज्याने तुला काॅलेज मध्ये
मदतीचा हात दिला होता?”
आईने तीच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला.
“हो ना, तुला त्याच्या बद्दल सर्व सांगीतले होते ना मागे.”
“परत सांग.आठवत नाही मला.” मान नकारार्थी डोलवत आई म्हणाली.
मग तिने कॉलेजमध्ये झालेले सर्व पहिल्यापासून सांगितले. बाहेरून हळूच दबक्या पावलाने आलेल्या अमोलने हे सगळे मन लावून ऐकले होते. ऐकता ऐकता मध्येच तो म्हणाला,”आई तायडी प्रेमात पडलीये त्याच्या.”
“ए शहाण्या गप बस, असं काही नाही आहे.”
“खरं आहे का अबोली हे?”आईचा प्रश्न.
तिने काहीही न बोलता नुसतेच आईच्या चेहर्याकडे बघितले, तर तेव्हा आईने तिच्या नजरेतला भाव लगेच टिपला.
“पण अबोली, पप्पांना नाही आवडणार हे तुझ्या.”काहिश्या हरवत त्या लगेच बोलल्या.
“पण आई मला तो आवडला आहे.”आईच्या पदराचे टोक तर्जनीला गुंडाळत अबोली ने सांगितले.
“हे होणार नाही गंऽ, उगीच अट्टाहास करू नको. मृगजळा पाठीमागे धावल्यासारखे होईल. तो कोण? आपण कोण?”आई.
“दुसऱ्या कुणाशीच लग्न करायची माझी इच्छा नाही.” गुंडाळलेले बोट मोकळे करत ती म्हणाली.
“सगळंच अवघड करून ठेवलं बाई तू” कपाळावर आठ्या पाडत आई म्हणाली. आणि ती तिच्या कामासाठी निघून गेली.
#गुलाबाची कळी बघा हळदीने माखली
हे असं झाल्यावर तिने अगदी ठाम निश्चय केला की,’आता फोन आला की त्याला नक्की सांगायचे म्हणजे सांगायचेच.’
ठरवल्याप्रमाणे तिने त्याला फोन आला तेव्हा सांगून टाकले. तेव्हा त्याने सांगितले की, “नेक्स्ट मंथ पासुन माझे काहि दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ आहे. तेव्हा मी तिकडे येईन, आणि आल्यानंतर भेटेल.
आईने वेळ बघुन वडिलांच्या कानावर ही गोष्ट घातली. “असं काही नाही होणार.आम्ही मुलगा ठरवला आहे.चांगला आहे.शिक्षण भरपुर झाले आहे.आणि काॅलेज मध्ये नोकरीला आहे.” ते एवढं बोलून बाहेर निघाले.
“अहो माझं पुढं ऐकुन तर घ्या.”आईने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण छे.ते तोपर्यंत दाराबाहेर ही पडले.
दोन दिवसांनी..
रात्रीची सगळ्यांची जेवणं चालू होती. सगळे म्हणजे अबोली, अमोल तिचे आई-वडील आणि आजी असे सर्वजण रात्रीचं जेवण बरोबरच करत असत.
जेवता जेवता अबोलीचे वडील म्हणाले,”आई नगरच्या पाहुण्यांनी पसंती दिली आहे. शिवाय पत्रिका ही जुळली आहे. तेव्हा ते परवा लग्न पक्क करण्यासाठी येत आहेत. तर सर्व घर आवरून व्यवस्थित ठेवा बरं का मनीषाबाई.” नवऱ्याचे हे बोलणे ऐकून मनीषा बाईच्या हातातला घास हातातच राहिला. त्यांनी हळूच अबोलीच्या चेहऱ्यावरचे भाव वाचले. तिने तिच्या मनातली घालमेल चेहऱ्यावर न येण्यासाठी लगेच डोळे मिटवून घेतले. तीरीही हे ऐकून ती शॉक झाली होती. पण वडिलांसमोर बोलायची तिची हिम्मत झाली नाही. काय बोलणारहोती? निरजच्या मनातले हिला काहीच माहित नव्हते. त्यामुळेही काहीच बोलता आले नाही.
पाहुणे आले, लग्न ठरले. आणि सगळ्यात जवळचा मुहूर्तही ठरवला. त्यामुळे लगेच घरात लग्नाची गडबड सुरू झाली. कारण हातात एक ते दीड महिनाच होता.
लग्नासाठी कार्यालय बुकिंग झाले, अहेराची सगळी खरेदी झाली. लग्न पत्रिका ही छापुन घरात आल्या.लग्नाची इतर कामेही आवरत आली.ड्युटी वरून आल्यावर ते हे सगळे करत होते.साहजिकच त्यांची धावपळ वाढली होती. दुसरा कुणाचाच आधार नव्हता.
सगळं एकट्यालाच करायचे होते. नोकरीच्या गावी राहत असल्याने जवळचे असे कोणीच नव्हते लग्नाआधी दोन दिवस येऊन सगळेच करू लागतीलच पण…
आता अवघं आठ दिवसांवर लग्न येऊन ठेपले होते. तर लग्नाच्या दोन तीन दिवसांच्या कार्यक्रमांचे नियोजन ते करत बसलेले होते.नुकताच चहा झाला होता.वहीत काही तरी लीहीता लीहीताच अचानकच अबोलीच्या वडीलांना चक्कर आली.आणि घाम यायला लागला.असं सर्व पाहुन पटकन मनीषाबाईने त्यांना हाॅस्पीटल मध्ये नेले. जाईपर्यंत पॅरॅलिसिसचा अटॅक आला हॉस्पिटलमध्ये लगेच ट्रीटमेंट चालू झाली. आणि काही दिवस येथेच ऍडमिट करावे लागेल.” असे सांगितले घरात लग्नाची तयारी चालू होती आणि हे असं सगळं.. मनीषाबाई तर हवालदिल झाल्या होत्या.काय करावे तिला काहीच समजेना सुचेना.
अबोली होती धीर द्यायला. अमोल तसा लहानच होता. आणि आजीने तर हंबरडाच फोडला होता, तिलाच सावरायला शेजारच्या काकू आल्या होत्या. मनीषाबाई दवाखान्यातून हलणार नव्हत्याच चार दिवस झाले होते. पेशंटची कंडिशन स्थिर होती.
अबोलीच्या सासरचे म्हणजेच तिचे सासू-सासरे हे दोघेही भेटायला आले होते. लग्नाविषयी काय करायचे असा त्यांनी विचारलं कारण साहजिकच आहे.
चार दिवसांवरच लग्न येऊन ठेपलं होतं. मनीषा बाईंनी सांगितले,” हे बरे झाल्याशिवाय मी काहीही बोलत नाही. आणि अबोलीने सांगितले होते की “बाबा ठीक झाल्याशिवाय मला लग्न करायचे नाही.” असं म्हणताना रडून रडून तिचे डोळे लाल आणि नाकाचा शेंडाही लाल झाला होता.
लग्न ठरल्यापासून अबोलीला नीरजशी बोलावे वाटत नव्हते.म्हणुन तोही टाळत होता फोन करणे.आता हे झालेलेही त्याला काहिच माहिती नव्हते.
अमोल हाही दवाखान्यातच थांबत होता.अबोली मात्र घर आणि दवाखाना असं दोन्ही पाहात होती.अमोल हा आईची होणारी तगमग आणि तीचे ओलावणारे डोळे पाहुन अस्वस्थ झाला होता. त्याने हळुच अबोलीचा फोन घेतला आणि नीरजला फोन करून इथे घडलेले सांगितले.
त्यामुळे दुसऱ्याच दिवशी सकाळी सकाळी नीरज हॉस्पिटलमध्ये हजर झाला. आल्यावर त्याने स्वतःचा परिचय बाबांना आणि मनीषा बाईंना करून दिला.
तेव्हा बाबांनी नजरेनेच “हो” म्हटले. कारण बोलता येत नव्हते. मनीषा बाईंना मात्र खुप खुप बरे वाटले नीरजला पाहुन.त्याच्याकडे त्यांनी भरलेल्या डोळ्यांनी पाहिले.त्यांच्या डोळ्यातले भाव नीरज ने वाचले.आणि लगेच तो म्हणाला,” आलोच मी डाॅक्टरांना भेटून.”
मनीषाबाईंनी मानेनेच होकार दिला.
डॉक्टरांना भेटून त्याने अबोलीच्या बाबांच्या प्रकृती विषयी व्यवस्थित चौकशी केली. त्यानंतर काही निर्णय त्यांनी स्वतः घेऊन, पुढील ट्रीटमेंट चालू केली. आणि दोन दिवस हॉस्पिटलमध्ये थांबून व्यवस्थित लक्ष दिले. तो हे स्वतःहून करतो आहे हे सर्व पाहून अबोलीला तर खूप आनंद झाला होता. वास्तविक अबोलीचे लग्न दुसऱ्या कुणाबरोबर होत आहे हे ऐकुण त्यालाही वाईट वाटले होतेच पण.. तिच्याशी असलेले मैत्रीचे नाते मात्र त्याला टीकवायचे होते.
अबोलीचा होणारा भावी नवरा म्हणजेच नवरा मुलगा एक दिवस येऊन गेला.ड्युटी असल्याने थांबता येत नाही असं म्हणाला.
अबोलीने आणि तिच्या आईने “हे बरे झाल्याशिवाय मी काहीच करू शकणार नाही.” असं सांगितल्यामुळे त्यांच्यात काय विचार विमर्श झाला त्यांचा त्यांनाच ठाऊक. झालेल्या या सर्व प्रकाराने मनीषाताई मात्र खूपच दुखावल्या गेल्या होत्या.
बघता बघता हळदीचा दिवस उजाडला. तरीही बाबा दवाखान्यातच. घरी ही सगळं शांत शांत होतं. अबोली देवासमोर हात जोडून बसली आणि देवाला म्हणाली,” काय प्रसंग आणलास देवा माझ्यावर? माझ्या पुढच्या आयुष्यात काय आहे? नियतीच्या मनात काय आहे?काहीच कळेना..”
आईकडचे आणि वडिलांकडचे नातेवाईक येऊन भेटून जात होते. पण मदतीसाठी कुणीही थांबत नव्हते.त्या सर्वांनी देखील लग्नाची तयारी केलेली होतीपण…
मात्र अबोलीची आत्या म्हणजेच मनीषाताईंच्या ननंद बाई या तर परत जायचे नाहीच म्हणाल्या.”भाऊला बरं झालेलं बघीन, आणि नंतरच मी तिकडे येईल.” असं नवऱ्याला त्यांनी ठणकावून सांगितली होते.
अनेकांचे लग्ना विषयीचे निरनिराळे सूर निघू लागले.
होतील का अबोलीचे बाबा बरे?
तीच्या लग्नाचे काय होईल?
पुढील भागत बघुया.
(ही कथा पुर्ण पणे काल्पनिक आहे)
@सौ. शुभांगी सुहास जुजगर.
0 टिप्पण्या