फॉलोअर

खारीचा वाटा


खारीचा वाटा: भाग १

शांताला जाग आली, तशी ती उठून बसली. आणि बाथरूमला जाण्यासाठी उठली.

 दार उघडून ती बाहेर आली. तर.. बाहेर हलकसं उजाडलेलं तिला दिसलं, बाथरूमला जाऊन आल्यावर तिने पोरीकडे एक नजर टाकली. तिच्या अंगावरचे पांघरूण व्यवस्थित केले. झोळीतल्या बाळालाही बघितले, तेही शांत झोपलेले होते. तरीही हलकासा झोका दिला. मालकाकडे (नवरा) लक्ष गेले तर तेही एका अंगावर पोटात पाय घेऊन झोपले होते.


ती परत बाहेर आली. सकाळ झाली होती.

 म्हणून "आता उठावंच लागेल". असं म्हणून तिने झाडू हातात घेतला. घरासमोर थोडी मोकळी जागा होती तिथे.. तिने दोन-तीन पत्र टाकून घेतलेली होती. त्यामुळे पावसापाण्याची चूल आणि सरपण भिजत नव्हते.

 तेथील सर्व झाडून तिने स्वच्छ केले. आणि चूल पेटवली, व त्यावर आंघोळीसाठी पाणी ठेवले. ढण ढण करत चुल पेटू लागली , तसा तिचा उजेड बाहेरच्या अंगणात दिसू लागला.

 मग तिने बाहेरचे अंगण हे खराट्याने झाडून स्वच्छ केले. कचराही व्यवस्थित भरून टाकला. मग त्यावर सडा टाकला, आणि रांगोळी काढायला बसली होती. आतापर्यंत बाहेर चांगलंच उजाडलं होतं .एवढ्यात शेजारच्या राधाक्का ही बाहेर झाडून घ्यायला आल्या. पण शांताला पाहून त्यांनी तिला,

"इकडे ये" असं खुणावले. शांतही लगेच त्यांच्याकडे गेली.

 तर त्या म्हणाल्या," काही कळालं का तुला?"

"नाही हो." शांता म्हणाली,


"तुझ्या मालकिणबाई कडे रात्री चोरी झाली.लई मोठे दागिने गेले आहेत. असे कळाले ." राधाक्का म्हणाल्या.

तिचा क्षण भर कानावर विश्वासच बसेना.


थोडं थांबुन परत राधाक्का म्हणाल्या, "पहाटं चार ला धनुला फोन आलता,म्हणून तो जावून आलाय. तर.. कपाटातील रोख रक्कम,दागिनं आन् दोघी सासु सुनाच्या अंगावरलं 

दागिनं हिसकुन घेतलं".


"लई इपरित घडलं. हे मला नाय बाय काय माहित. दिसभराच्या कामानं जीव थकून जातो." असं शांता म्हणाली.


पण हे ऐकून तिच्या जीवाला चुट पुट लागून राहिली. दोघीजणी म्हणजे, मालकीणबाई आणि सुनबाई तिच्या डोळ्यासमोर दिसू लागल्या.ती घरात आली.

तर मालक उठून तोंड धुत होते. तिने त्यांना हे सर्व सांगितले.

 तेव्हा ते म्हणाले," चहा पी. आणि वाड्यावर चक्कर मारून ये."


 ती वाड्याकडे निघाली.

 पण वाड्याच्या मोठ्या दारात बरीच लोक होती. म्हणून ती बाजूच्या दाराने वाड्यात गेली. तर समोरच मालकिणबाई, डोक्याला हात लावून बसलेल्या होत्या.तर सुनबाई,

 सकाळच्या कामाला लागल्या होत्या.

 शांताने हळूच आवाज दिला, "मालकिन बाईऽऽ" तसं मालकिन बाईने तिच्याकडे पाहिले.

"आलीस बाई. रात्री दोन वाजल्यापासून हा सगळा गोंधळ सुरू आहे.जनावराच्या वाड्याकडून, ते मधी वाड्यात घुसलेत. आणि सर्वच त्यांनी पसार केले.कपाटातील रोकड ,कालच कापसाचे पैसे मिळाले होते.दागिने ही गेले.त्यानंतर माझ्या हातातील अंगठ्या ,पाटल्या ,सुनबाई धावत आली तर ,तिच्याही बांगड्या ,गळ्यातील मंगळसूत्र ही नेलं त्या राक्षसांनी."

असं म्हणून त्या थांबल्या.

ही कथा आपण kusumanjali.com var वाचत आहात 

शांता जीवाचे कान करून ऐकत होती.


काहि दिवसांपूर्वीच दोन महिन्याचे पैसे आगाऊ द्या म्हणुन.तिने मागीतले होते .पण... "नाही" अस तिला ऐकावं लागलं होत. लेक बाळंतपणाला येणार .म्हणून कमी जास्त जवळ असावेत.असं म्हणुन..


गेल्या आठ दहा वर्षा पासुन ती या वाड्यावर काम करत होती.जनावरांच्या गोठ्यातील शेण काढून साफसफाई करणे,आणि सर्व वाडा झाडून स्वच्छ करणे.परत घरातील दुपारची भांडी घासणे.एवढे ती येथे करत होती.


तिचे मालक (पती, काही ठिकणी पतीला मालक म्हणण्याची पध्दत आहे.)हमाली करत होते.दिवसभरांत पोटापुरते ते कमवत होते.

तिला दोन मुली होत्या. दोघीही आपापल्या घरी सुखाने नांदत होत्या. त्यातली लहान मुलगी बाळांतपणाला आलेली होती. ती बाळंत होऊन मुलगा झालेला होता. त्यामुळे तिची ओढाताण होत होती. पण जेवढे जमेल तेवढे ती करतच होती. पोटाला चिमटा देऊन लेकीला जपत होती. तिची काळजी घेत होती. खाऊ पिऊही घालत होती.    

 


शांतेऽऽ 

हा आवाज ऐकून ती भानावर आली.

"दोन वाजल्यापासून डोळ्याला डोळा नाही बघ. मारहाण जास्त होऊ नये म्हणुन त्यांच्यासमोर हात जोडले. आणि, मारु नका.म्हणले तेव्हा हातातील दागिनं ओरबाडून घेतलं.म्हणुन हात आणि बोटं तेवढी दुखताहेत."

असं म्हणताना खोकल्याची उबळ त्यांना आली.


इतक्यात सुनबाई समोर येऊन थांबल्या होत्या.

"बघाना, काय झालंय हे. त्या दिवशी तुम्हीआगाऊ पैसे मागितल्यावर 'नाहीऽऽ' म्हणाल्या, सासुबाई. पण आज मात्र स्वतःच्याच हाताने बोटातील अंगठ्या आणि पाटल्या काढून दिल्या."

"त्याचं काय नाय बघा तायसाब,म्या काय बी मनात ठेवलं नाय. तुमचं मीठ खाते मी. असलं काय मनात पण आणु नकाऽऽ."


"वाईट वाटत आहे गं मला.जिथे खरंच गरज होती, तिथे नाही म्हणायचं अन्..." सुनबाई खेद व्यक्त करत म्हणाल्या.


 "अहो ताई ऽऽ तुम्हा सर्वांची पुण्याई थोर हाये. माझ्या सारखी दहा जण हायेत तुम्हा कडं. आमचं म्हणाल तर,आमचंच आम्हास जड झालं हाय. देवाचे आभार माना बघा.तुम्ही समदं लेकरंबाळासहित नीट राहिलासा. काय दगा फटका झाला असता तर! ते केवढ्याला पडलं असतं?"


 दोघींचीही समजुत काढण्याचा तिने प्रयत्न केला.


"बरं येते घरचं आवरून."


"बरं बरं येऽऽ." असं मालकिन बाई म्हणाल्या.


तेवढ्यात सुनबाई ने थांबायला सांगितले.अन् ती स्वयंपाक घरात निघुन गेली. डिंकवडयाचे सामान होते त्यातले काही सामान तिने पिशवीत भरले. आणि ती पिशवी तिने शांताबाई ला दिली.

 "हे तुझ्या लेकीसाठी बघ.बाळ चांगले गुटगुटीत, आणि हुशार होऊ दे."

ते देताना एक प्रकारचे समाधान तिच्या चेहर्‍यावर दिसत होते.


"कश्याला ताईसाब ?"

"राहु दे. आणि हे घे पैसे. याचे बाळासाठी कपडे घे. आणि हो, लेक सासरी जाण्यापूर्वी तिला माझ्या कडे न विसरता घेऊन ये. समजले का!"

"बरं ताई साब." असं म्हणुन शांता निघुन आली.


पण,

काहितरी ठाम असे मनात सुनबाई ने ठरवले होते.

शांता निघुन गेली. तसे सर्व जण आपापल्या कामाला लागले.ताई साहेबांनीही पुढचे काम हातात घेतले.

मालकिणबाई म्हणाल्या, "जया मी झोपते गं तासभर अजुन. "

"ठिक आहे.झोप पुरेशी झाल्यावर बरे वाटेल." जया म्हणाली.

 ही जया म्हणजेच ताई साहेब..


जया ही एक शहरात राहणारी सायन्स ग्रॅज्युएट मुलगी. मनात काहीतरी नवीन करण्याचे स्वप्न होते.


पण मालकिणबाई म्हणजे जयाची आत्याबाई ...


या आत्याचे यजमान आचानक देवाघरी गेले. आणि सर्वच कारभार तिच्या म्हणजेच आत्याच्या अंगावर पडला. मोठ्या मुलीचे लग्न झाले होते.लहान मुलगी लग्नाची होती.मधला रणजित हा शिक्षणासाठी पुण्यात होता.पण वडील गेल्यावर तो गावी आला.

"इथला सगळा व्याप सोडून तु पुण्याला जावू नको."

असं आईने सांगीतले म्हणुन, त्यालाही जाता आले नाही.


शेती भरपुर होती.तिचा लवाजमाही तितकाच होता.जनावरे, नोकर ,गडी,आणि शेतीत रोज कामाला येणाऱ्ये कामकरी मजुर वेगळेच.. 


हे सर्व पाहून रणजितनेही जाण्याचा हट्ट धरला नाही.दुसर्‍याचा कुणाचाही सहारा त्यांना नव्हता.

रणजितनेही हळुहळु सगळे लक्ष शेतीत लावले.तो या कार्यात चांगलाच रूळला. नवनवीन प्रयोग तो शेतीत करू लागला.अगदी वडलां सारखाच...त्याचं शेत हसणारं ,फुलणारं ,आणि सुगंधीतही झालं होतं.म्हणजेच फुलांची पण त्याने लागवड केली होती.


काही दिवसांनंतर लहान बहिणीचे सुस्थळी लग्न झाले.रणजितने लग्नाची व्यवस्था उत्तम केली होती.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात 

एक दिवस बहिणीने (म्हणजेच रणजितच्या आईने)भावाकडे जयाचा हात रणजित साठी मागितला.

"हे जे वैभव आहे ते चांगल्या आणि विश्वासु हातात जावं,एवढीच अपेक्षा आहे."

अशी बहिणीने गळ घातल्यामुळे जयाच्या वडिलांना नकार देणे जमलेच नाही.रणजित ही कुठेच उणा नव्हता.जयाही तोलास तोल होतीच. प्रश्न फक्त शहर नसुन खेडे होता.पण घरात सर्व सुख सुविधा होत्या.


लग्न खुपच थाटात पार पडले.जया भरपुर दागिन्यात उंची वस्त्र लेवुन जणु वैभवलक्ष्मीच घरात प्रवेश करती झाली.


हळुहळु संसार फुलला. जया दोन मुलांची आई झाली. दिवस आनंदाने जात होते.

 दोन मुलं म्हणजे विराज आणि विशाखा. 

  विराज आठ वर्षाचा झाला होता. विशाखा चार वर्षाची. अशातच हे विरजण पडले.. घरी चोरी झाली, लाखो रुपयाचा ऐवज चोरीस गेला.. तो सापडेल तेव्हा सापडेल, किंवा नाही ही...


 म्हणुन तिने शांताबाई च्या या नातवाला म्हणजेच लेकीच्या मुलाला दत्तक घ्यायचे ठरवले..त्याचा सर्व शैक्षणिक खर्च करून त्याला योग्य आणि चांगले शिक्षण द्यायचे.जेणेकरून तो उद्याचा एक जबाबदार नागरिक बनेल.


कारण तिच्या लेकीचा नवराही जवळच्याच गावी रहात होता.आणि मोलमजुरी करूनच आपला उदरनिर्वाह चालवित होता.

 

हा एकच नाही तर आणखी काही जे आई वडील आपल्या मुला मुलींचा शैक्षणिक खर्च करण्यात असमर्थ आहेत.. इच्छा असुनही ते पाल्यांना शिक्षण देऊ शकत नाही..तर या अशा मुलांच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहून

त्याच्या आयुष्याला आकार देण्याचा वसा तिने घ्यायचा ठरवला. 


हा विचार तिने रणजित आणि आत्याशीही शेअर केला. 

" एवढा सगळा खर्च करायचा?" असे आत्या म्हणाल्या.

 " हो." ज्या म्हणाली.

"मला नाही पटत."आत्या. 

तिने रणजीत कडे पाहिले, त्याला पटले होते.

"अहो,असे चोराने नेण्यापेक्षा एखाद्या मुलाच्या आयुष्याला आकार देऊन, त्याचं सोनं करूया."ज्या म्हणाली.

"बरं बाई,बघा तुम्हाला योग्य वाटते ते करा. माझं काय आता!.. पिकलं पान.." असं आत्या जरा रागात म्हणाली.


रणजित म्हणाला. "ठीक आहे. सुरुवात करूया." हे ऐकून तिच्या अंगावर मुठभर मास चढल्यासारखे झाले.

हळुहळु तिने काम चालू केले. काहि दिवसांनी गावातील दोन मुले तिने दत्तक घेतली. नुकतेच सातवीतुन आठवी मध्ये त्यांनी ऍडमिशन घेतले होते पण..काहि कारणांमुळे त्यांना शाळा सोडली लागणार होती..

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात 


 या बरोबरच तिने मुलांचे ट्युशन घ्यायला ही सुरुवात केली. गावामध्ये तशी दहावीपर्यंत शाळा होती. बरीच मुलं दहावीपर्यंत शिक्षण घेत होती त्यानंतर मात्र ते शिक्षणाकडे पाठ फिरवत होते. यामध्ये जास्त मुलींची संख्या असायची. सातवीपर्यंत भरपूर मुली असत.. पण सातवीच्या नंतर मात्र हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच मुली शिक्षण घेत होत्या.


ट्युशन घ्यायला सुरुवात केल्यामुळे, साहजिकच, मुलांच्या किंवा मुलींच्या हुशारीला पैलु पाडण्याचे काम ती करु लागली.

शिक्षणासाठी ते प्रेरित होऊ लागले. आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी शहराकडे धाव घेऊ लागले .

अशेच तिचे स्वप्न हळूहळू आकार घेऊ लागले. लहान मुलांसाठी बालवाडी चालू केली. तीन-चार वर्षाची मुले तिच्या नजरे खालून जाऊ लागली. त्यासाठी तिने गावातीलच शिकलेल्या दोन मुलींना शिकवण्यासाठी ठेवले. यातूनच त्याही स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या.


 असे करत करत पुढे चौथी इयत्ता पर्यंत शाळा काढली. व्याप वाढला.. रणजीतही तिला यामध्ये मदत करतच होता. या सर्व गोष्टींची त्यालाही आवड होतीच.. खरे तर. त्याला प्राध्यापक व्हायचे होते. पण ते स्वप्न अपुरेच राहिले होते..


गेल्या आठ दहा वर्षांपासून जयाताईंचे हे काम चालुच होते.तिने शिक्षणासाठी दत्तक घेतले द्या मुलांची संख्या हि वाढली होती. 


ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात 

या वर्षी म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी तिने दत्तक घेतलेल्या मुलांची "जवाहर नवोदय विद्यालय" या साठी निवड झाली होती. गेली दोन वर्षे एकेक. आणि या वर्षी दोन म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी..

तिच्या मेहनतीचे हे फळ म्हणजे तिची कमाईच होती.


जया, आज देवापुढे मंद समई लावुन हात जोडुन बसली होती."देवा, आजपर्यंत साथ दिली.या पुढे पण.. असाच तुझा आशिर्वाद मला असु दे.या माझ्या कामाचा वृक्ष असाच सदाहरित राहुन त्याच वटवृक्ष होऊ दे..

ही मुले सुजाण नागरिक म्हणून देशहितासाठी कार्य करू देत.समाजाला त्यांचे भुषण वाटु

दे.. तेव्हाच हा माझा खारीचा वाटा खऱ्याअर्थात सफल होईल."


असे म्हणताना तिच्या नेत्रकडा ओलांवुन अश्रु नकळत तिच्या गालावरून ओघळले होते.


लेखिका- सौ. शुभांगी सुहास जुजगर.

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या