फॉलोअर

मोगऱ्याच्या दरवळ...

 मोगऱ्याचा दरवळ...



 अलकाताई पैठणी नेसुन छान तयार झाल्या..

 नंतर पाट मांडुन त्यावर सुंदर कापड टाकून पाटासमोर छानशी रांगोळी काढली..मग पाटावर त्यांनी सुगडे ठेवली, त्यामध्ये संक्रांतीची वान भरले..पुजेसाठी ताटामध्ये हळद कुंकू तिळाचे लाडु ठेवले..विडा ही ठेवला..
अशी पूजेची जवळजवळ सर्वच तयारी झाली होती.म्हणून मग त्यांनी,
"अगं चल, आवरले का नाही अजुन तुझे?
 चल लवकर, उशीर होतो आहे."
 अलकाताई ने सुनेला आवाज दिला..

 थोड्यावेळाने श्वेता मस्त पैकी तयार होऊन बाहेर हॉलमध्ये आली.. अलकाताईंनी तिच्याकडे पाहिले..
अन् म्हणाल्या,"व्वा व्वा खुपच छान."
निळसर कलरच्या पैठणीला राणी कलरचे काठ.. अगदिच छान!!.अगदी मोजक्या दागिन्यातही ती उठून दिसत होती.. हातात काचेच्या भरपूर चुडा भरावा तशा बांगड्या.. अगदी साडीच्या काठाला मॅचिंग होतील अशा.. नाकात नथ.. गळ्यामध्ये नाजूक अशी ठुशी.. आणि कमरेभोवती इवलासा पण सुबक असा कंबरपट्टा.. असे हे रूप पाहूनही थोडेसे काहीतरी अपूर्ण राहिले.. असे अलका ताईंना वाटले.. त्या विचारात पडल्या.. एकदम त्यांना आठवले.. अरे! गजरा लावलेला नाही.. 
मुळात आपण गजरा आणायलाच विसरलो काल.. म्हणून त्यांनी लगेच अक्षयच्या बाबांना आवाज दिला," अहो ऐकलं का" 

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात

"काय म्हणताय, सांगा.." अक्षय चे बाबा म्हणाले.
"गजरे सांगायला विसरले हो काल मी.अक्षयला."
"मग मी आणून देऊ म्हणता."
"हो पटकन घेऊन या बरे."
 आणि त्या श्वेताला म्हणाल्या."अग थांब जरा, बाबा तुझ्यासाठी गजरा आणायला गेले आहेत..नंतर पूजेला सुरुवात कर."
 "ठीक आहे." श्वेता म्हणाली. आणि तेथून निघून गेली.

 अलकाताई खुर्चीमध्ये गजरा येण्याची वाट पाहत बसल्या..पण त्या स्वतःच्याच मागील आठवणीत हरवल्या..

अलका ही नवी नवी नवरीच होती. लग्नापूर्वी माहेरी, बऱ्याच जणांनी तिला केळवण्यासाठी बोलावले होते. पण आता लग्न झाल्यावर सुद्धा नवऱ्याच्या मित्राने म्हणजे सुधाने, आम्हा दोघांना जोडीने केळवण केले. रविवार असा सुट्टीचा दिवस पाहून आम्ही दोघं त्यांच्या घरी गेलो. त्यांच्याघरी गेल्यावर, मुलीने त्यांच्या छान स्वागत केले. आणि बसायला सांगितले. त्यानंतर पाणीही दिले. मीही छान म्हणजे साखरपुड्याची साडी घालून गेले होते.

 अगदी छान खरपूस असा वास, किचन मधून येत होता. मग मित्राच्या बायकोने मला किचन मध्ये येण्यास सांगितले. म्हणून मग मीही मध्ये जाऊन चटईवर बसले. तर त्या चटई पुढे, म्हणजे ताटा भोवती छान सुंदर अशी रांगोळी काढलेली होती.आम्हा दोघांच्या ही ताटाभोवती.आणि ताटेही तयारच होती वाढुन. आम्हा दोघांनाही जेवायला बसवले. मस्त पुरणपोळीचा बेत होता.आणखी ताटात आंब्याचा रस,कटाची आमटी, बासमती तांदुळाचा भात, भजी, कुरडई, दह्यातील चटणी आणि वर साजूक तूप. 
हे सर्व पाहून मी म्हणाले,"एवढे सगळं कशाला केलं, ताई?"
यावर त्या म्हणाल्या, "तुमचे नवीन लग्न झालं आहे. आणि छान 'लक्ष्मी नारायणाचा जोडा' जेऊ घालण्याचे पुण्य मी कसं सोडू." सुधाची बायको म्हणाली.
"काहीतरीच तुमचं." मी म्हणाले.
आणि मी जेवायला सुरुवात केली. एक एक पदार्थाची चव घेऊन बघितली. तर सगळेच छान झाले होते. त्यातली मला जास्त आवडली ती म्हणजे, 'दह्यातली चटणी'.
छान जेवण झालं. त्यानंतर पानाचा विडा ही दिला. आणि मग निघण्याच्या वेळी त्यांनी माझी ओटी ही भरली. आणि ओटीत आंबा घातला. 
आणि म्हणाल्या, "पुढच्या वर्षी हाच आंबा मुल बनवून तुझ्या मांडीवर असेल बघ." मी हे ऐकून लाजले.
आणि म्हणाले, "काहीही तुमचं."

त्यानंतर त्यांनी सुंदर अशी मोगऱ्याची वेणीही मला दिली. आणि केसांना लावायला सांगितली. 
म्हणाल्या, "या फुलांचा सुगंध तुमच्या संसारात भरून राहू दे."
नंतर आम्ही परतलो. माझी आणि त्यांची पुढे छान मैत्री झाली.

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात

..आता लग्नाला जवळ जवळ म्हणजे महिना झाला असेल..आणि घरात म्हणजे भावकी मध्ये दोन लग्न असल्यामुळे घरामध्ये पाहुणे मंडळींची सारखी येजा चालू होती.. हनिमून साठी त्यांना कुठेही जाता आले नव्हते.. लग्नानंतर सासर्‍यांनी बळेच आम्हा दोघांना महाबळेश्वरला पाठवले.. 

तसं तर मला बाहेर जास्त आवडत नव्हते.. काय अशी सवयच नव्हती.. घरी कसे सगळे अंगवळणी पडलेले असते.. तसेही इथे म्हणजे सासरी आल्यावर.. अशा बऱ्याच गोष्टींमध्ये तिला तडजोड करावी लागली होती.. सगळे तिला अवघड जात होते.. कामाचा हा अखंड डोलारा सांभाळता सांभाळता तिला नाकीनऊ येत होती.. पण ती हळूहळू यामध्ये रुळायला लागली होती.. 

सासुबाई समजून घेत होत्या.. कामे नीट समजावून सांगून करूनही घेत होत्या..पूर्ण दिवस तसा कामातच जात होता.. अक्षय चे बाबा साखर कारखान्यात नोकरीला होते.. ते दिवसभर घरी नसायचे रात्री आल्यानंतर जेवण वगैरे झाल्यावर उशिरानेच दोघांना बोलायला मिळत होते.

महाबळेश्वर ला जाताना प्रथमच आम्ही दोघांनी तो दिवस पूर्ण एकमेकांसोबत घालवला.. मी मात्र खूप खुश होते.. एकमेकांच्या सहवासाची ओढ वाढत होती.. दिवसभराच्या प्रवासाने खूप थकवा आलेला होता.. थांबण्याची व्यवस्था करून फ्रेश होऊन आम्ही जेवण केले.. जेवण झाल्यावर,
"मी थोडे फिरून येतो तू येतेस का?"
 असे अक्षयचे बाबा म्हणाले.. पण. 
"मी थकले आहे, तुम्ही जाऊन या.." असे मी म्हणाले..

 ते निघून गेली मी जरा पुस्तक वाचत पडले.. वाचनाची आवड असल्यामुळे मी नेहमीच पर्समध्ये वाचनीय असे काहीतरी ठेवत असे.. (पुस्तक वगैरे) 

अर्धा पाऊण तास उलटून गेला पण अक्षय चे बाबा आले नाहीत.. 
तशी मला काळजी वाटायला लागली.. सारखे घड्याळाकडे लक्ष जाऊ लागले.. काट्याची टिकटिक तर काळजावर आघात करू लागली.. एक, एक सेकंदही, खूप मोठा वेळ वाटू लागला.. तेव्हा फोनची सुविधा नव्हती..

 बऱ्याच वेळाने दार वाजले.. 
"अहो किती वेळऽऽ."
 मी जवळजवळ ओरडलेच.. पण त्यांनी मात्र हातानेच थांब थांब असा इशारा केला.. मी मात्र खूप चिडले होते माझ्या मनात, नाही नाही ते विचार एवढ्या वेळात येऊन गेले होते.. त्यामुळे मनावर खूप ताण आलेला होता.. त्यांच्या हातात एक पुडा होता.. मग ते मला म्हणाले,
"तू जरा डोळे मीट. मी तुझ्यासाठी काहीतरी आणले आहे."
 मलाही उत्सुकता लागली की मला ह्यांनी काय आणले? मला डोळे मिटायचे नव्हते.. पण त्यांनाही नाराज करायचे नव्हते.. म्हणून मी डोळे मिटून घेतले..
 आणि प्रतीक्षा करू लागले "उघड" म्हणण्याची मला पुडी सोडल्याची जाणीव झाली.. वाटले हातावर काहीतरी ठेवतील.. आणि मला डोळे उघड म्हणतील.. पणछे!

 मला माझ्या केसात काहीतरी होत आहे याची जाणीव झाली.. म्हणून मी,"काय करता?" असे विचारले ते काहीच बोलले नाही.. मग माझे दोन्ही हात त्यांनी हातात घेतले हलकेसे काहीतरी हातात ठेवले.. हातात काही आहे.. याची जाणीव मला झाली.. छानसा सुगंध नाकाला जाणवत होता.. 
"आता डोळे उघड." असं ते म्हणाले.
 म्हणून मी डोळे उघडले पहाते तर काय एक छानसा शुभ्र असा मोगऱ्याचा गजरा माझ्या हातात होता आणि केसातही गजरे माळलेले होते.. मी त्यांच्याकडे बघून मंद स्मित केले.. आणि म्हणाले," छान आवडले मला.."
 असं म्हणून मी हात नाका जवळ नेला.. आणि तो गंध मी माझ्या देहात भरून घेतला.. जणू प्रेमाचा हा सुगंध माझ्या तना मनाला आणि आयुष्याला सुगंधित करीत होता..

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात

 त्यानंतर हलकेच माझ्या गालावरची केसांची बट बाजूला करत हे म्हणाले,"आवडले का?" मी मानेनेच "हो" म्हणाले पुन्हा ते म्हणाले,
"हे बघ, हे फुल आणि त्याचा येणारा गंध.. हे कधीच वेगळे होत नाहीत तसेच आपणही या फुलांसारखं कधीच वेगळं व्हायचं नाही.. असेच एकमेकांच्या मिठीत राहायचे कायमसाठी.."
 हे ऐकून मी ही त्यांच्या मिठीत कधी सामावले ते माझे मलाही कळले नाही.. अगदी फुलाच्या पाकळीत जसा गंध…


 सौ.शुभांगी सुहास जुजगर .



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या