सौभाग्यवती हो..
रंजुच्या कपाळी सौभाग्याची कुंकू लागलेले पाहून, शीलाताईंना आज खुप खुप छान वाटत होते.
'आमच्यात पुनर्विवाह करत नाहीत' या एकाच विचारावर ठाम असलेल्या रंजुचे, आज विजय सोबत लग्न झाले होते.
रंजु ही खेड्यातून शहरात कामानिमित्त आलेली मुलगी..
'राहण्यासाठी घर हवं' म्हणून ती घर शोधत शोधत शीलाताईंच्या घरासमोर येऊन थांबली. शीलाताई या बाहेरच बसलेल्या होत्या.
तर तिने ताईंना विचारले,"काकू तुमच्याकडे रूम आहे का किरायाने?"
तेव्हा काकू म्हणाल्या,"कोणासाठी विचारतेआहेस?"
"मलाच पाहिजे होती." रंजुने सांगितले.
"किती जण राहणार आहेत?"
ताईंचा प्रश्न.
"मी एकटीच आहे."
' एकटीच आहे' असं म्हटल्यानंतर तिला, "घरात ये" असं त्या म्हणाल्या.
आणि तिला रूम दाखवली. त्यांची रूम ही चैनल गेट जवळ एकच अगदी छोटी रूम होती. सिंगल रूम असल्यामुळे कुणाही जेन्ट्स ला त्या देत नव्हत्या.
रंजुला ती रूम आवडली. आणि तिने दोन दिवसात सामान आणले. खाण्याचे आणि झोपण्याचे. या व्यतिरिक्त तिच्याकडे काहीच नव्हते.
शहरातील कुठल्यातरी पेन बनवणाऱ्या कंपनीमध्ये ती काम करत होती. आणि पोटापुरते कमवत होती.
हळूहळू रंजुचा परिचय शीलाताईंना होऊ लागला.आणि त्या दोघीही अधिक जवळ आल्या.
रंजु एक विधवा होती. दोन वर्षांपूर्वीच तिचे पती गेले होते. उनापुरा दोन वर्षाचा त्यांचा संसार होता. 'पुन्हा लग्न करायचे नाही' असे तिला सर्वांनी सांगितले होते. पण हळूहळू सर्व चित्र बदलले. नवरा हा दररोजच्या कमाईवर पोट भरणारा होता. घरात आई-वडील होते. छोटेसे राहते घर सोडले तर काहीच प्रॉपर्टी नव्हती. नवरा गेल्यानंतर सासरे आणि त्यानंतर सासुबाई ही गेल्या. हिला काहीच आधार राहिला नाही. माहेरी ही वडील गेले.भाऊ हा मतिमंद होता. म्हणून त्याचे लग्नही झाले नव्हते.'मी ह्याला बघू की तुला?' असे आईने सांगितले.
त्यामुळे ही पूर्णच निराधार झाली. म्हणून मग हिनेच हिंमत धरून कंपनीत छोटीशी नोकरी मिळवली. आणि स्वतःचे उदरभरणाची सोय केली.
अशी तिची कहाणी ऐकून शीलाताईंना तिच्या विषयी अधिकच जवळीक निर्माण झाली. आणि तिच्याविषयी एक प्रकारची आस्था ही निर्माण झाली. अडीनडीला मग रंजुच त्यांना कामं पडत होती.
काही दिवसातच रंजु त्यांच्याच घरातील एक व्यक्ती झाली. शीलाताईंना दोन्ही मुलंच होती. दोघेही मोठे म्हणजे एक दहावीला तर दुसरा सातवीला होता. त्यांच्या सहवासात राहून रंजुचे मन परिवर्तित होऊ लागले.
त्या हिला, 'दुसरे लग्न कर.' असे नेहमीच सांगत होत्या. ही नाही म्हणत होती.
पण पदोपदी येणारे अनुभव तिला खूप काही शिकवू लागले. आणि मग हळूहळू जीवन जगताना नुसता पैसाच असून उपयोग नाही. तर समजून घेणारा योग्य जोडीदार ही पाहिजे असतो. हे सत्यही तिला पटले. आणि मग हळूहळू तिचेही मन पुन्हा लग्न करण्याच्या विचाराने प्रेरित झाले. पण आता नवरा कोण शोधणार?
हा प्रश्न होता.
योगायोगाने शीलाताईंच्या भावकीत लग्न ठरले. आणि त्या लग्नासाठीचे काही पाहुणे यांच्याकडेच उतरले. त्यांचे चहा, नाश्ता आणि काय हवं, काय नको. तर ते रंजुच पाहत होती. कारण शीलाताई या लग्न घरी लग्नाच्या तयारीसाठी गेलेल्या होत्या.आलेल्या पाहुण्यांनी रंजूचे काम पाहिले. तिचे बोलणे आणि वागणेही पाहिले.
त्यामुळे शीलाताईंच्या मिस्टरांच्या मावस भावाने, त्याच्या मोठ्या मुलासाठी रंजुचा हात मागितला. त्याची बायको दोन वर्षांपूर्वी कोरोना मध्ये गेली होती. जॉईन फॅमिली होती. सुख वस्तुही होती.
शीलाताईंनी स्वतः सगळी खात्री करून घेतली. तसं सर्व त्यांना माहीत होतं. रंजु विषयी त्यांना वाटायचं एवढ्या छान पोरीच्या नशिबी वैधव्य आलेले, त्यांना पाहावतच नव्हते.पण त्यातून आता हा मार्ग निघाला होता. म्हणूनच त्यांनी पुढाकार घेऊन आणि सर्व छान जुळवुन आणले होते. लग्नासाठी चा योग्य शुभमुहूर्त पाहून दिवस ठरवण्यात आला.
रंजुला लाल साडी, डोक्यावर लाल ओढणी,
गळ्यात मंगळसुत्र आणि मुख्य म्हणजे कपाळावर सौभाग्याचे कुंकू,या वेशात त्यांना पाहायचे होते.
आणि आज त्यांचे हेच स्वप्न पुर्ण झाले होते.
सौ.शुभांगी सुहास जुजगर.
२)निळी बाहुली..
काही दिवसापूर्वी मी एका लग्नाला गेले होते. मिस्टरांच्या मित्राच्या मुलीचे लग्न होते. मोठा पसारा असलेला तो त्यांचा मित्र. अर्थात लग्नातही सगळे असेच होते.
पण तिथे गेल्यानंतर म्हणजे कार्यालयामध्ये, मला काहीतरी वेगळेच असे पाहायला मिळाले.
तर ते म्हणजे 'बाहुल्यांचे गाव' कार्यालयातील एका बाजूला छान असे एका बाजुला लाईटचे डेकोरेशन करून, तो भाग सजवला होता. मध्ये काय होते…?
तर मध्ये एक छोटीसी आपण एक वाडी (गाव)म्हणुन हवं तर. वसवलेले होते. आणि त्या गावातील महिला या आपापल्या कामात व्यस्त असलेल्या दाखवलेल्या होत्या.
तर या महिला म्हणजेच छान सुंदर अशा बाहुल्या, त्या अगदी पैठणी साडी नेसुन आणि सुंदर सुंदर ज्वेलरी घातलेल्या इवल्याल्या निळसर डोळ्यांच्या त्या सर्वच बाहुल्या खुपच मनात भरत होत्या. त्या आपली घरातील दररोजची कामेच करत होत्या..
म्हणजे एक जात्यावर दळण दळत होती. तर दुसरी उखळात धान्य कांडत होती,कुणी सुपामध्ये दळण घोळण्यात मग्न होती.कुणी चुलीवर भाकरी करत होते,तर कुणी गोठ्यातील गाईला आईच्या मायेने चारा टाकत होते.तर एक बाहुली नक्षीदार डेऱ्यात ताक घुसळत होती . बाजुलाच एक विहीर ही दाखवली होती. आणि त्या विहिरीतुन एक बाहुली पाणी काढत होती. हे असे सगळे चित्र पाहुन मला खुपच प्रसन्न वाटले.आणि मग मला लहानपणी हीच कामे करताना ची माझी आजी आठवली,आई आठवली, बाहेर खेळत असताना जवळच असलेल्या एका विहिरीतुन पाणी काढत असलेल्या काही स्त्रिया आठवल्या.
माझी उत्सुकता आणखी वाढली.म्हणून मी हे कोणी केलेले आहे याविषयी चौकशी केली. चौकशी केली तर, हे नवरीच्या मैत्रिणीने केलेले आहे,असे कळाले. आणि ती मैत्रीणही लग्नात आलेली होती.
मग मी तिला भेटले. आणि तिचं खुप खुप अभिनंदन केलं. हे असं वेगळं काही तरी तु दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
"ही कल्पना कशी सुचली तुला?"मी विचारले.
तिला बघितल्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तिचेही डोळे निळसर आहेत.
"नमस्ते काकु, माझे नाव निलाक्षी."तीने सांगितले.
"अगदी साजेसेच नाव आहे गं तुझं.कसं कसं काय करतेस ग तु हे सगळं हे?"
"मला ना लहानपणापासूनच बाहुल्या खूपच आवडतात.त्यामुळे मी मुद्दाम आई-बाबांना निळे डोळे असलेल्या बाहुल्या आणायला सांगत होते. पहिली बाहुली मला आजीने नवरात्राच्या यात्रेतून आणुन दिली. आणून दिली तेव्हा मी तीन वर्षाची होते. छान डोळे मिचकावणारी ती बाहुली होती. मला ती खूपच आवडली. आणि तेव्हापासूनच मी बाहुलीच्या प्रेमात पडले.
पुढे कॉलेजला गेल्यावर मी थोडा अभ्यास केला. की या थीम वर मी काय करू शकते! तर मला हळूहळू आयडिया येत गेली. मग मी काम स्टार्ट केले."
"आणि सगळ्या बाहुल्यांचे डोळे निळसरच आहेत.?" माझा प्रश्न..
"हो हो. तो माझा लकी कलर ठरला. म्हणून मग मी त्याच रंगाच्या डोळ्यांच्या भावल्यांची मागणी करते. आज मला अशाच लग्नासाठी आणि इतरही फंक्शन साठीच्या ऑर्डरी येत आहेत."
लग्नाच्या गडबडीतही ती मला एवढं बोलली. मग मीही तिला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.
तिला भेटून मला असे वाटले, 'खरेच हातातले कौशल्य म्हणजे, एका त्या उडणाऱ्या म्हातारी सारखेच आहे. जे योग्य दिशेने गेले असता 'सितारे तोड लावु'असंही म्हणता येईल.
@सौ.शुभांगी सुहास जुजगर.
0 टिप्पण्या